कालव्यालगतची अतिक्रमणे तात्काळ काढा,अजित पवारांचे महापालिका प्रशासनास आदेश

पुणे : शहरातील कालव्यालगत असलेल्या महापालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचीच्या तक्रारी शहरातील काही आमदारांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यापुढे मांडल्या. याबाबत महापालिकेकडून कारवाई होत नसल्याचे आमदारांनी सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी येत्या दोन-तीन दिवसांत शहरातील कालव्यालगतची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि अतिक्रमण काढून टाकून जागा ताब्यात घेण्याचे आदेश महापालिका प्रशासनास दिले आहेत.
अजित पवार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत कौन्सिल हाॅल येथे कालवा समितीची बैठक झाली. त्यात शहरातील कालव्या शेजारी असलेल्या जागेवर खासगी व्यक्तींकडून अतिक्रमण झाले आहे, तसेच या अतिक्रमण जागेवर मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे, ही बाब माहीत असतानाही आणि निदर्शनास आणून दिल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून काहीच पाऊल उचलले जात नाही, याकडे काही आमदारांनी लक्ष वेधले. त्याचप्रमाणे शहरात अनधिकृतपणे पाण्याचा वापर होत असतानाही त्यावर काहीच लक्ष दिले जात नाही, असेही काही आमदारांनी सांगितले.
हेही वाचा – आम आदमी पार्टीचे सर्व प्रभागांत उमेदवार
या सर्व पार्श्वभूमीवर पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण का काढले जात नाही, याचा जाब अजित पवारांनी पालिका प्रशासनास विचारला. पूर्ण पोलीस बंदोबस्तात कालव्या शेजारी झालेल्या जागेवरील अतिक्रमण तातडतोब काढा. शासनाची जागा असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून दिरंगाई का केली जात आहे, असा प्रश्नही अजित पवारांनी महापालिका प्रशासनास विचारला. त्यानंतर याबाबत ततडीने कारवाई केली जईल आणि येत्या दोन-तीन दिवसांत सर्व अतिक्रमणे काढली जातील, असे महापालिका प्रशासनाकडून आश्वस्त करण्यात आले.