‘दत्ता गाडेला फाशीची शिक्षा दिली, तरी आम्हाला मान्य’; आरोपीच्या भावाची भूमिका

पुणे | पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचे भाऊ आणि आरोपीचे वकील वाजिद खान व साजीद शाह यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. आम्ही आरोपीची बाजू मांडत आहोत, म्हणून आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर रिल पोस्ट केले जात आहेत. त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षणाची गरज भासू लागली आहे. यापुढे एखाद्या बलात्कारातील आरोपीचा खटला वकिलाने लढावा की नाही? इतपत परिस्थिती चिघळली आहे. कुणीही उठून फोन करून त्रास देत आहे, अशी भूमिका वकील वाजिद खान यांनी मांडली.
आरोपीचे भाऊ म्हणाले, की आरोपी दत्ता गाडे गुलटेकडी भाजी मार्केट यार्डममध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. भाजीपाला विकून येत असताना स्वारगेट बस डेपोमध्ये सदर प्रकार घडला. आमचा पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे. न्यायालयावरही आमचा विश्वास आहे. ज्या पीडित महिलेबरोबर घटना घडली, त्यांनाही न्याय मिळायला हवा. न्यायालय जो निकाल देईल, तो आम्हाला मान्य असेल. न्यायालयाने दत्ता गाडेला फाशीची शिक्षा दिली, तरी आम्हाला मान्य आहे. त्याचे आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही. पण या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी.
हेही वाचा : ‘रोहित शर्मा लठ्ठ आणि सर्वात वाईट कर्णधार’; काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांची टीका
माध्यमाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली. चौकशीनंतर नाण्याची दुसरी बाजूही दाखवावी. गावातल्या लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आमच्याशी संपर्क ठेवण्याची त्यांची अजिबात इच्छा नाही, असेही आरोपीच्या भावाने सांगितले.