To The Point : चिंचवडमध्ये नाना काटेंचे ‘तुतारी’चे संकेत अन् तुषार कामठेंची वाजली ‘राजकीय पिपाणी’!
म्हणाले... विधानसभा निवडणुकीत आमच्याकडे असंख्य उमेदवार! : ‘फेसबूक लाईव्ह’ करीत केला नाना काटेंच्या वक्तव्याचा निषेध
पिंपरी । अविनाश आदक
पिंपरी-चिंचवड महाविकास आघाडीचा प्रभावी चेहरा शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघाबाबत अत्यंत स्फोटक वक्तव्य केले आहे. ‘‘या मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे असंख्य उमेदवार आहेत. त्यामुळे आमच्याकडे उमेदवारच नाहीत, असा अपप्रचार कोणी ज्येष्ठ नेत्यांनी करु नये. पहिलीच वेळ आहे. त्यामुळे निषेध करतो… पुढच्या वेळी योग्य जागा दाखवली जाईल’’, असा गर्भीत इशाराच दिला. त्यामुळे चिंचवडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महाविकास आघाडीकडून राज्यातील सर्वच २८८ मतदार संघांमध्ये चाचपणी सुरू झाली आहे. किंबहुना, शरद पवार गटाकडून काही ठिकाणी उमेदवारी घोषीतही केली आहे. आता पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड मतदार संघातून शरद पवार गटाकडून किंवा मविआकडून कोण लढणार? याबाबत चर्चा सुरू झाली.
दरम्यान, एका आघाडीच्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांची मुलाखत घेतली. यादरम्यान, ‘‘मी निवडणुकीसाठी इच्छुक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढणार आहे आणि चिन्हावर निवडणूक लढणार आहे. ज्या पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही. त्यापैकी मला कुणाकडून विचारणा झाली नाही. पण, मी निवडणूक पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहे.’’ असा दावा त्यांनी केला. यामुळे चिंचवडमध्ये नाना काटे ‘‘तुतारी’’ च्या चिन्हावर निवडणूक लढतील, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयातून रात्री ‘FB Live’ केले. त्याद्वारे चिंचवडमधून महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार नाना काटे व राहुल कलाटे यांना अप्रत्यक्ष सुनावले. ‘‘आमच्या पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे गेल्या १ लाख मतांचा दावा करणाऱ्यांना किती मते मिळाली, हे सर्वांच्या लक्षात आले आहे. पक्षाकडे उमेदवार नाहीत, असा अपप्रचार करु नये. पहिली वेळ आहे म्हणून निषेध करतो… पुन्हा असे झाल्यास योग्य जागा दाखवली जाईल’’ अशा शब्दांत त्यांनी काटे-कलाटे यांचा समाचार घेतला.
वास्तविक, चिंचवडमधून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी. या करिता शहराध्यक्ष तुषार कामठे स्वत: प्रयत्नशील आहेत. तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे. पण, भोसरीमध्ये अजित गव्हाणे यांचा पक्षप्रवेश आणि उमेदवारीची शक्यता पाहाता शरद पवार चिंचवडमध्येही महायुतीमधील उमेदवार आयात करु शकतात किंवा राहुल कलाटे यांना गळाला लावू शकतात, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, तुषार कामठे यांची अस्वस्थता वाढली असून, नाना काटेंनी ‘तुतारी’ वाजवण्याचे संकेत दिल्यामुळे कामठे यांनी ‘राजकीय पिपाणी वाजवली’ असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
चिंचवडमध्ये शरद पवार गटाची ‘सेटलमेंट’….
काही दिवसांपूर्वी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात उमेदवारीवरुन दोन गट तयार होतील, असे चित्र होते. त्यावेळी ‘‘जगताप कुटुंबातील कोणीही उमेदवार आमच्याकडे आला, तर पक्षात स्वागत करु…’’ अशी जाहीर भूमिका शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी घेतली होती. दरम्यान, अजित पवार गटाचे तत्कालीन शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. कामठे यांनी त्यांचेही स्वागत केले. किंबहुना, त्यांच्या प्रचारासाठी भोसरीत झालेल्या सभेत जोरदार भाषणबाजीही केली. पण, चिंचवडमध्ये त्यांना नाना काटे व राहुल कलाटे यांच्यासारख्या ताकदीच्या उमेदवारांचे वावडे आहे. कारण, कामठे स्वत: इच्छुक आहेत किंवा कामठे ‘जगताप पॅटर्न’ राबवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कामठे यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्ष वाढवाचा आहे की ‘सेटलमेंट’ चे राजकारण करायचे आहे? असा शरद पवार गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.