लिहिलेलं पुसता येतं, पण कोरलेलं नाही..; रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर रितेश देशमुखची पोस्ट

Riteish Deshmukh | लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने नुकतंच बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत भाषण करत असताना रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या लातूरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर, रितेश देशमुखने सुद्धा यासंदर्भात व्हिडीओ शेअर केला आहे.
“सर्वांनी दोन्ही हात उंच करून घोषणा द्यायची आहे, भारत माता की जय, वंदे मातरम्, वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, खरंतर आपल्या सर्वांचा उत्साह पाहिला तर लक्षात येतंय की, १०० टक्के विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, यात काही शंका नाही” असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं.
हेही वाचा : नगरसेवक नाही, तर लोकसेवक म्हणून काम करणार; प्रभाग ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झंझावाती प्रचार
या वक्तव्याचा तीव्र निषेध करत आमदार अमित देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या संदर्भात जे विधान केलंय, ते अत्यंत दुर्दैवी दुःखदायक आहे, त्यांच्याकडून आणि भारतीय जनता पक्षाकडूनही अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती, त्यांच्या या वक्तव्यामुळे आम्हा सर्व लातूरकरांची मनं दुखावली आहेत. आम्ही त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहोत, असे अमित देशमुख म्हणाले.
दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख यांनीही यावर प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, पण कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र, असे म्हणत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.




