Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! मिलिंद नार्वेकरांचा भास्कर जाधवांना खोचक टोला

मुंबई | ठाकरे गटाचे ६ खासदार बंडाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांमुळे आधीच राजकीय खळबळ उडालेली असताना, आता पक्षातील दोन बड्या नेत्यांमधील अंतर्गत वाद थेट चव्हाट्यावर आला आहे. आमदार भास्कर जाधव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यात उडालेला शाब्दिक भडका आता सोशल मीडियापर्यंत पोहोचला आहे. भास्कर जाधवांनी केलेल्या एका विधानाचा व्हिडिओ शेअर करत मिलिंद नार्वेकरांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घातले आहे.

नेमकं काय घडलं?

१९ जून रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा झाला. या कार्यक्रमादरम्यान भास्कर जाधव हे एका वृत्तवाहिनीला अधिकृत प्रतिक्रिया देत होते. त्याच वेळी त्यांच्या मागून मिलिंद नार्वेकर यांची गाडी आली. समोर माध्यम प्रतिनिधींची गर्दी असल्याने तिथून रस्ता काढण्यासाठी नार्वेकरांच्या चालकाने सतत हॉर्न वाजवला.

प्रतिक्रिया देण्यात अडथळा आल्याने भास्कर जाधव यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅमेऱ्यासमोरच तीव्र संताप व्यक्त केला. “नार्वेकर कोण लागून गेला?” असे संतप्त उद्गार काढत जाधवांनी, “ही पद्धत बरोबर नाही. ते आमचे नेते असले म्हणून काय झालं?” असा थेट सवाल उपस्थित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

हेही वाचा

” ..तर तुमचा देशच शिल्लक राहणार नाही”; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी

मिलिंद नार्वेकरांची ‘एक्स’वर पोस्ट

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी ‘एक्स’वर (ट्विटर) हा व्हिडिओ पोस्ट करत भास्कर जाधवांना अत्यंत बोचरी आणि उपरोधिक टोलेबाजी केली. नार्वेकरांनी लिहिले, “माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे!”

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ पत्राचा संदर्भ

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले आहे. या अधिवेशनात भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. याच पत्राचा संदर्भ घेत मिलिंद नार्वेकरांनी फडणवीसांना उपरोधिक साकडे घातले आहे. जाधवांना लवकरात लवकर विरोधी पक्षनेतेपद द्या, जेणेकरून त्यांच्या या मानसिक त्रासाचा फटका पक्षातल्या इतरांना बसणार नाही, असा खोचक टोला नार्वेकरांनी लगावला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button