गडचिरोलीत नक्षलवादाला मोठा धक्का; भूपतीसह ६० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, मुख्यमंत्री म्हणाले..

गडचिरोली | राज्यातील नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. तब्बल ४० वर्षांपासून सक्रिय असलेला वरिष्ठ नक्षलवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याने अखेर आपल्या ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. भूपतीवर विविध राज्यांमध्ये मिळून तब्बल १० कोटींहून अधिकचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. या ऐतिहासिक आत्मसमर्पणावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या जवळपास ४० वर्षांपासून सातत्याने नक्षलवादाशी लढणारा गडचिरोली जिल्हा, सुरुवातीच्या काळात चंद्रपूर, भंडारा, गोंदीया हा भाग देखील नक्षलवादाने ग्रस्त होता. त्यामध्ये विषेशतः गडचिरोली जिल्हा हा सीमावर्ती भाग आहे. हा सर्व भाग मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित राहिला. ज्यावेळी कोडापल्ली सितारामय्याने पीपल्स वार ग्रुप तयार केला, त्यानंतर तेव्हाचा आंध्र प्रदेश आणि गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात मावोवादी सक्रिय झाले आणि येथील युवकांमध्ये व्यवस्थेच्या विरोधात संभ्रम निर्माण करण्यात आला.
हेही वाचा : प्रियदर्शनी स्कूलच्या शरयू रांजणे हिची भारतीय संघात निवड
भारतीय संविधानाने आपल्याला न्याय मिळवू शकत नाही, असा संभ्रम तेव्हा येथील युवकांमध्ये निर्माण केला गेला, तसेच जंगलातून आपण राज्य चालवून एक नवी व्यवस्था उभी करू अशा प्रकारचं स्वप्न त्यावेळी तरुणांना दाखवलं गेलं. त्यावेळी अनेक तरुण या स्वप्नाला बळी पडले, त्यांना वाटलं की त्या व्यवस्थेतून समता येईल. मात्र, खरी समता फक्त संविधानाने येऊ शकते. त्या काळात अनेक तरुण माओवादी चळवळीकडे ओळले. मात्र, त्यानंतर त्यांच्या सर्व स्वप्नांचा खरा चेहरा समोर आला. आज सोनू उर्फ भूपतीचं आत्मसमर्पण आपण घेतलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
गेल्या १० वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एक योजना आखण्यात आली. त्यामध्ये एकीकडे प्रशासन आणि विकास समाजातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचला पाहिजे, तसेच दुसरीकडे जे लोकं शस्त्र घेऊन हिंसाचार करतात त्यांच्यासमोर दोनच विकल्प ठेवायचे. एकतर त्यांनी शस्त्र सोडून मुख्य व्यवस्थेत सहभागी व्हायचं. अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जायचं. अशा प्रकारची योजना आखण्यात आली. त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या देशातून माओवाद हद्दपार करण्यासाठी चांगलं काम केलं आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.




