अभिनयाचा बादशाह बिग बींनी थोपटली पुरंदरच्या रांगोळी चित्रकाराची पाठ!
सोमनाथ भोंगळे यांच्या कलेला अमिताभ बच्चन यांचा मानाचा मुजरा

पुणे । विजयकुमार हरिश्चंद्रे
बॉलीवूडचे शहेनशाह आणि अनेकांच्या प्रेरणास्थान असलेल्या अमिताभ बच्चन यांनी पुरंदर तालुक्यातील नामवंत रांगोळी कलाकार सोमनाथ भोंगळे यांच्या प्रतिभेची दखल घेत थेट मुंबईतील ‘जलसा’ बंगल्यावर बोलावून त्यांचा सन्मान केला. भोंगळे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बिग बींच्या वाढदिवसानिमित्त साकारलेल्या थ्रीडी रांगोळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अनेक अविस्मरणीय भूमिका, अगदी ‘शोले’मधील जयपासून ते ‘पिकू’मधील भास्कर बॅनर्जीपर्यंतच्या व्यक्तिरेखा हुबेहूब रंगावल्या गेल्या. या सृजनशीलतेमुळे भारावून गेलेल्या बच्चन यांनी स्वतः फोन करून भोंगळेंना भेटीसाठी आमंत्रित केले आणि त्यांच्या कलेला मुक्तकंठाने दाद दिली.
हेही वाचा : गडचिरोलीत नक्षलवादाला मोठा धक्का; भूपतीसह ६० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, मुख्यमंत्री म्हणाले..

ही त्यांची दुसरी भेट असून, अचानक आलेल्या फोनमुळे भोंगळे चकित झाले. “हा क्षण मी कधीही विसरणार नाही,” असे त्यांनी सांगितले. जलसा या बच्चन यांच्या निवासस्थानी प्रत्यक्षात रांगोळी साकारण्याची संधी मिळणे हे कोणत्याही कलाकारासाठी स्वप्नवत ठरावे असेच आहे.
सोमनाथ भोंगळे हे विविध सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर आधारित रांगोळ्यांसाठी ओळखले जातात. त्यांची ‘पंढरपूर वारी’वरील रांगोळी मालिकाही विशेष गाजली आहे. मात्र बिग बी हे त्यांचे विशेष जिव्हाळ्याचे दैवत असून, दरवर्षी त्यांचा वाढदिवस हा एक रांगोळी सोहळा ठरतो. बिग बींनी त्यांच्या पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप आणि दिलेला वेळ हा भोंगळे यांच्यासारख्या ग्रामीण भागातील कलाकारासाठी केवळ सन्मान नव्हे, तर प्रेरणेचा अमूल्य ठेवा ठरणार आहे.
“अमिताभ बच्चन सरांचा अचानक आलेला फोन माझ्यासाठी स्वप्नवत होता. त्यांनी माझ्या रांगोळी कलेची दखल घेतली, जलसा बंगल्यावर आमंत्रित केलं आणि स्वतःच्या हाताने पाठ थोपटली… हा क्षण माझ्या आयुष्याचा सर्वोच्च सन्मान आहे. ही केवळ भेट नव्हे, तर एका ग्रामीण कलाकाराच्या कलेला मिळालेली मोठी पावती आहे.”
– सोमनाथ भोंगळे, रांगोळी कलाकार.




