Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“विजय सरकार कधीही कोसळू शकतं, मध्यावधी निवडणुकांसाठी सज्ज राहा”; एम. के. स्टालिन यांचं मोठं वक्तव्य

M K Stalin | तमिळनाडूच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू असून ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे प्रमुख आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचे नवे सरकार अल्पायुषी ठरेल, असा मोठा दावा द्रमुक (DMK) प्रमुख एम. के. स्टालिन यांनी केला आहे. “राज्यातील विद्यमान सरकार कधीही कोसळू शकतं, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी आत्तापासूनच सज्ज राहावं,” अशा स्पष्ट सूचना स्टालिन यांनी पक्षाच्या जिल्हा सचिवांना दिल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्टालिन यांनी पक्षाची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निराश झालेल्या कार्यकर्त्यांना धीर दिला आणि आगामी रणनीती आखण्यास सांगितले. सध्याच्या संख्याबळाचा विचार केला तर मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाकडे स्वतःच्या १०७ जागा आहेत. मित्रपक्ष काँग्रेसच्या ५ आमदारांसह हे संख्याबळ ११२ वर पोहोचते. सरकार स्थापनेसाठी विजय यांना द्रमुकच्या (DMK) ४ मित्रपक्षांनी (प्रत्येकी २ जागा) बाहेरून पाठिंबा दिला आहे. याशिवाय, गेल्या आठवड्यात झालेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी अण्णाद्रमुकच्या (AIADMK) २५ बंडखोर आमदारांनी विजय सरकारच्या बाजूने मतदान केले होते.

हेही वाचा

IPL 2026 प्लेऑफचे ३ संघ निश्चित, आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये ‘कांटे की टक्कर’!

मात्र, हे समीकरण जास्त काळ टिकणार नाही, असा द्रमुकचा अंदाज आहे. बाहेरून पाठिंबा देणारे मित्रपक्ष (VCK, CPI, CPM आणि IUML) कधीही पाठिंबा काढून घेऊ शकतात. त्यातच अण्णाद्रमुकच्या २५ बंडखोर आमदारांवर विधानसभा अध्यक्ष किंवा न्यायालयाकडून अपात्रतेची टांगती तलवार आहे. हे आमदार अपात्र ठरल्यास विजय सरकार अल्पमतात येईल आणि राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होईल, अशी दाट शक्यता आहे.

२०२९ मध्येच पुन्हा विधानसभा निवडणुका?

बैठकीत बोलताना माजी मुख्यमंत्री स्टालिन म्हणाले, “हा पराभव तात्पुरता आहे. राज्यातील सध्याचे सरकार कधीही पडू शकते. त्यामुळे गाफील न राहता तयार राहा. २०२९ च्या लोकसभा निवडणुकांसोबतच तमिळनाडूत पुन्हा विधानसभा निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. आपण जोरदार पुनरागमन करू आणि पुन्हा एकदा सत्ता मिळवू.” कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्टालिन यांनी, “तमिळनाडूच्या राजकारणात ‘सूर्याचा’ (द्रमुकचे निवडणूक चिन्ह) अस्त कधीच होऊ शकत नाही,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.

तमिळनाडूच्या राजकीय इतिहासात गेल्या ५९ वर्षांपासून द्रविडी पक्षांचे (DMK आणि AIADMK) वर्चस्व राहिले आहे. मात्र, जोसेफ विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाने या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेत दोन्ही पारंपरिक पक्षांना विरोधी बाकांवर बसवले आहे. अशातच स्टालिन यांच्या या विधानाने तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात नवा कलगितुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button