प्रियदर्शनी स्कूलच्या शरयू रांजणे हिची भारतीय संघात निवड
पिंपरी चिंचवड शहराच्या लौकिकात मानाचा तुरा

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल भोसरी इंद्रायणी नगर येथील एसएससी बोर्ड इयत्ता दहावीची विद्यार्थिनी शरयू रांजणे हिची भारतीय बॅडमिंटन संघात निवड झाली आहे. शरयूच्या या कामगिरीमुळे पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकात मानाचा तुरा खोवला गेला आहे. याबद्दल शाळेच्या वतीने तिचे कौतुक देखील करण्यात आले आहे.
शरयू रांजणेची सिंगल, डबल आणि मिक्स डबल स्पर्धेमध्ये निवड झाली असून तीनही संघात निवड होणारी शरयू ही भारतातील एकमेव खेळाडू आहे. चीन येथे होणाऱ्या एशियन बॅडमिंटन चैम्पियनशिप स्पर्धेमध्ये शरपू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलतर्फे नुकताच शरयूचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेच्या संस्थापक सचिव तरुणा सिंह यांच्या हस्ते शरयूला गौरविण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या अर्पिता दीक्षित, डॉ. गायत्री जाधव तसेच शरयूचे कुटुंबीय आदी उपस्थित होते.
हेही वाचा : “मी नाही, माझा पक्ष लढेल”; प्रशांत किशोर यांचा मोठा राजकीय निर्णय
शरयू हिने यापूर्वी महाराष्ट्र व देशातील विविध ठिकाणी बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिके मिळवली आहेत. शरयू ही पूर्व प्राथमिक वर्गापासून प्रियदर्शनी स्कूलची विद्यार्थिनी आहे तिच्या या गौरवास्पद कामगिरीचे प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे संचालक विश्वस्त डॉ राजेंद्र सिंह, डॉ. जितेंद्र सिंह, नरेंद्र सिंह, महेंद्र सिंह, सरिता सिंह यांनी कौतुक केले असून चीन मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना
प्रियदर्शनी स्कूलतर्फे विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक विकासाला चालना दिली जात नाही तर कला, क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. भाविक अहिरे ही सुद्धा प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलची विद्यार्थिनी आहे. इंद्रायणी नगर येथील सीबीएसई बोर्डाची विद्यार्थिनी आहे. भाविकाने अंडर 19 साठी क्रिकेट संघात स्थान मिळाले आहे. तसेच वर्ल्डकप जिंकून आणणाऱ्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
शिक्षण क्षेत्रात नवा आयाम
प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल या शिक्षण संस्थेला मोठा शैक्षणिक वारसा आहे. गेल्या 30 वर्षात पिंपरी चिंचवड शहरांमध्ये शाळेने शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणले. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता जागतिक व्यासपीठावर चमकावे यासाठी शाळेचे प्रयत्न असतात. याच धर्तीवर “ब्रह्मप्रिया” संस्थेच्या माध्यमातून प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल शिक्षण क्षेत्राला नवा आयाम देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शाळेच्या संस्थापक सचिव तरुणा सिंह यांनी सांगितले. ब्रह्मप्रिया ही शैक्षणिक, संस्था, अध्यात्म, खेळ,आरोग्य, या सर्व गोष्टींचा पुरस्कार करून सर्वांगीण शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तरुणा सिंह यावेळी म्हणाल्या.




