‘चुकीला माफी होऊ शकते, पण गद्दारीला माफी नाही’; खासदार अमोल कोल्हेंची टीका

Amol Kolhe | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीती रणधुमाळी सुरू आहे. राज्यात प्रचारासाठी प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. चुकीला माफी होऊ शकते, पण गद्दारीला माफी नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले.
अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
अशा प्रकारची परिस्थिती ओढावत असेल तर मी जे म्हणालो त्या पद्धतीने चुकीला माफी होते. पण गद्दारीला माफी होत नाही. एवढ्या मोठ्या दिग्गज नेत्याला जर गावोगावी फिरावं लागत असेल तर जनतेचा कौल काय? हे लक्षात घ्यायला हवं. उपमुख्यमंत्री अजित पवार गेली ३० ते ३५ वर्ष समाजकारण आणि राजकारणात आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात नेमकी काय हे त्यांना नक्कीच कळलं असेल. त्यामुळे त्यांना भावनिक आवाहन करावं लागत असेल. याचाच दुसरा अर्थ असा होतो की, जनतेने ठरवलंय की महाविकास आघाडी सत्तेत आणायची. पक्ष फोडणं आणि चिन्ह पळवणं याला महाराष्ट्रात थारा नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले.
हेही वाचा – ‘उद्धव ठाकरेंकडून बाण गेला, उरलेत फक्त खान’; राज ठाकरेंची टीका
मला वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजेत. कारण त्यांनी एक प्रकारे कबुली दिली आहे की, १० वर्ष सत्तेत असल्यानंतरही ते देशाला सुरक्षित ठेऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी ही कबुली दिली की काय? हा प्रश्न निर्माण होतो. तसेच ‘बटेंगे तो कटेंगे’ असा प्रचार महायुतीला करावा लागत असेल तर मग या सरकारने काय विकास केला? असंही अमोल कोल्हे म्हणाले.





