‘उद्धव ठाकरेंकडून बाण गेला, उरलेत फक्त खान’; राज ठाकरेंची टीका

Raj Thackeray | महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माझ्याशिवाय महायुतीचं सरकार बसणार नाही, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. दिडोशी येथे झालेल्या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच, दिंडोशी या ठिकाणी हारुन खानला उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे, इतकी वेळ त्यांच्या शिवसेनेवर आली का? असाही सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
राज ठाकरे म्हणाले, की मागच्या पाच वर्षांतला सगळा गोंधळ तुम्ही पाहिला आहे. काय गोष्टी घडल्या? कोण कुणाबरोबर गेलं? तुम्हाला माहीत आहे. कुठपर्यंत गेलं प्रकरण? हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ती आज एकनाथ शिंदेंकडे गेली. निवडणूक चिन्हासकट ती शिवसेना गेली. मला अजूनही आठवतंय मराठवाड्यात एक घोषणा होती. बाण हवा की खान? दुर्दैव असं की उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय. उरलेत फक्त खान. वर्सोव्यात उमेदवार कोण दिलाय? हारुन खान. हा शिवसेनेचा उमेदवार आहे. ज्याच्या नावात हारुन आहे तो विजयी कसा होईल? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.
हेही वाचा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिला घेत आहेत व्यवसायात भरारी
इथपर्यंत तुमची वेळ गेली? कडवट हिंदुत्ववादीपासून मुसलमानांसमोर लाचार होईपर्यंत. उबाठा शिवसेनेचे उमेदवार उर्दूत पत्रक काढत आहेत. कुठपर्यंत मजल गेली आहे बघा. मी मनसेच्या जाहिराती दिल्या मध्यंतरी वर्तमान पत्रांमध्ये. त्या तुम्ही कदाचित पाहिल्या असतील. मी टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावरही मराठी जाहिरात दिली होती. इंग्रजी वर्तमानपत्र आहे म्हणून इंग्रजीत जाहिरात नाही दिली. सगळ्याच गोष्टी सोडून द्यायच्या असतील तर तुमच्याकडे (उद्धव ठाकरे) उरलं काय? आपल्याकडे इथे छान कंदिल आहे. चांगली गोष्ट आहे. आपण शिवाजी पार्क मैदानावर दीपोत्सव साजरा करतो. तो दीपोत्सव बघायला हजारोंच्या संख्येने लोक येतात. रविवारी अचानक सगळे लाइट बंद करुन टाकले. १४ तारखेला पंतप्रधान येणार आहेत. त्यामुळे दिवाळीचे लाइट्स काढून टाकले. दिवाळीच्या लाइटशी पंतप्रधानांच्या सुरक्षेशी काय संबंध? नको तिथे कशाला सिक्युरीटी? असंही राज ठाकरे म्हणाले.





