
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ ला काही काळासाठी स्थगिती देण्यात आल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. संपूर्ण देशाला विश्वासात घेऊन त्यांनी पाकिस्तानला मात्र अनेक गोष्टींमध्ये इशारे दिले. याद राखा युद्ध संपलेले नाही..यापुढे ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग’ ची धमकी द्यायची नाही..यापुढे चर्चा होईल, ती पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवाद याच मुद्द्यांवर, असे त्यांनी ठासून सांगितले.
पाकला दहशतवादच गिळून टाकेल..
पाकिस्तानने लवकर शहाणे व्हावे आणि दहशतवाद निपटून काढावा, असे सांगून मोदी म्हणाले की एक दिवस हाच दहशतवाद पाकिस्तानला गिळून टाकेल.
पाकिस्तानला थेट तंबी ..
मोदी यांनी आपल्या संबोधनामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींना स्पर्श केला. अनेक मुद्द्यांवर त्यांनी पाकिस्तानला थेट तंबीच दिली आहे. विशेषतः ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग’, पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवाद यावर त्यांनी सुनावले.
दहशतवाद्यांचा बदला..
भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यांनी स्पष्टपणे सुनावले की येथून पुढे ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग’ चालणार नाही. त्याचा फटका लगेच देऊ.
हेही वाचा – ‘पुरवणी बजेटमध्ये सगळं भरून काढू’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नेमकं काय म्हणाले मोदी?
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये १०० हून अधिक खतरनाक दहशतवादी ठार झाले, दहशतवाद्यांचे अनेक ‘आका’ गेल्या तीन दशकापासून पाकिस्तानात जाहीरपणे फिरत होते. भारताविरोधात कारस्थाने रचत होते. भारताने एका झटक्यात त्यांचा खात्मा केला.
पाकिस्तान रांगायला लागले..
जेव्हा पाकिस्तानकडून याचना केली गेली. पाकिस्तानकडून जेव्हा सांगितलं गेलं की त्यांच्याकडून यापुढे कोणतीही दहशतवादी कारवाई केली जाणार नाही. सैन्य गोळीबार होणार नाही. त्यांनी लोटांगण घालून रांगणे पसंद केले. त्यावर भारताने विचार केला. आम्ही सध्या ‘ऑपरेशन सिंदूर’ फक्त स्थगित केलं आहे, येत्या काळात आम्ही पाकिस्तान काय भूमिका घेतो, कसा वागतो, हे पाहणार आहोत, असा इशारा यावेळी मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे.
भारताचे धोरण पूर्णपणे स्पष्ट..
मोदी म्हणाले की, भारताचे तिन्ही दल, बीएसएफ, अर्ध सैनिक दल सतत अलर्टवर आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर आता ‘ऑपरेशन सिंदूर’ ! दहशतवादाच्या विरोधात भारताचं हे धोरण आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ने दहशतवादाच्या विरोधातील लढाईत आता नवीन लक्ष्मण रेषा आखली आहे.
हल्ला झाला तर थेट उत्तर..
पहिली म्हणजे, भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर थेट उत्तर देणार. आमच्या पद्धतीने आमच्या अटीवर उत्तर देत राहणार. प्रत्येक ठिकाणी जाऊन कठोर कारवाई करणार, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानचा प्रचंड जळफळाट..
दरम्यान, भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला, पाकिस्तानच्या अनेक मंत्र्यांकडून न्युक्लिअर युद्धाच्या पोकळ धमक्या देखील देण्यात आल्या. यावर बोलताना मोदी यांनी पाकिस्तानला चांगलंच सुनावलं आहे, आता पूर्वीचा भारत राहिलेला नाही हा नवीन भारत आहे. कोणतंही ‘न्युक्लिअर ब्लॅकमेलिंग’ भारत सहन करणार नाही, न्यूक्लिअर ब्लॅकमेलच्या आडून वाढणाऱ्या दहशतवादी ठिकाणांवर भारत अचूक आणि निर्णायक प्रहार करणार, असा इशारा मोदींनी पाकिस्तानला दिला आहे.
1. पाकिस्तानची फौज.. पाकिस्तानचे सरकार.. ज्या पद्धतीने दहशतवाद्यांना खतपाणी घालत आहे, एक दिवस असा येईल की पाकिस्तानला ते गिळून टाकतील..
2. दहशतवाद आणि चर्चा,.. एकत्र राहू शकत नाहीत. दहशतवाद आणि व्यापार.. एकत्र चालू शकत नाही.. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे.
3. सीमेपलीकडून वार करायची तयारी पाकिस्तानने केली होती. पण, भारताने घुसून पाकिस्तानच्या थेट छातीवरच वार केला आहे.
4. दहशतवादाविरुद्धच्या लढाईने एक नवीन लक्ष्मणरेषा आखून घेतली आहे. नवीन कूटनीती, नवीन युद्धनीती आणि धडा शिकवण्याची नवीन पद्धत दाखवून दिली आहे.
5. यापुढे पाकिस्तानशी चर्चा होईल ती फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर याच विषयांवर !