पाणीटंचाईचा प्रश्न चिघळला : सोसायटीधारकांच्या तोंडाला प्रशासनाने पाने पुसली!
सोसायटीधारकांचा संताप, महापालिका प्रशासनाला आंदोलन- मोर्चाचा इशारा

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रामाणिक करदाते सोसायटीधारकांना मूलभूत पायाभूत सोयी-सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे आधीच नाराजी असलेल्या सोसायटीधारकांची पाणीटंचाईच्या मुद्यावर प्रचंड संताप पहायला मिळत आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी सोसायटीधारकांशी बैठक घेण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानंतर सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बैठकांचे आयोजन करण्यात आले. पण, या बैठकीतून काहीही हासील झाले नाही. किंबहुना, सोसायटीधारकांच्या तोंडाला पुन्हा एकदा प्रशासनाने पाने पुसली आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर १६ एप्रिल २०२६ रोजी महापालिकेच्या ड प्रभागात आयोजित करण्यात आलेली बैठक नागरिकांच्या तीव्र संतापाची साक्षीदार ठरली. मा. उच्च न्यायालय आणि पुणे विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार बोलावण्यात आलेल्या या बैठकीत शहरातील विविध हौसिंग सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणी समस्यांवर जोरदार आवाज उठवला. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांकडून ठोस उपाययोजनांऐवजी केवळ आश्वासनांचीच पुनरावृत्ती झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
बैठकीत पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे प्रतिनिधी सचिन लोंढे, उदय साबदे आणि पुरुषोत्तम पाटील यांनी पाणी समस्येची कायदेशीर बाजू ठळकपणे मांडली. त्यांच्या सोबत तन्मय पदुडोने, सुधाकर दिवाण, अनिता तुतारे, तेजस्विनी ढोमसे सवाई, मीनाक्षी राणे, प्रशांत काटे, विक्रम खोपडे, विजय कणसे, हरीश चौधरी, प्रीतम बीजमवॉर, गौतम परमार, रविंद्र पांडोळे आदींसह सुमारे ७० हून अधिक सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महापालिकेकडून श्री. धुमाळ, श्री. महेश बरीदे आणि श्री. जय कानडे यांनी बैठकीत सहभाग घेतला.

हेही वाचा : ‘महिला आरक्षण विधेयक देशाच्या भविष्याला दिशा देणारे’; मंत्री रक्षा खडसे
महत्त्वाच्या मागण्या प्रलंबितच…
शहरातील अनेक भागांमध्यें गेल्या ७ ते १३ वर्षांपासून पाणीपुरवठा अनियमित असून काही ठिकाणी अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. पिंपळे सौदागर, वाकड, ताथवडे (शनी मंदिर रस्ता) आणि भुजबळ वस्ती परिसरातील नागरिकांनी विशेषतः तीव्र नाराजी व्यक्त केली. काही भागात दररोज पाणीपुरवठा होत असताना इतर ठिकाणी दिवसाआड पाणी मिळत असल्याने भेदभाव होत असल्याचा आरोपही करण्यात आला. ऑगस्ट २०२५ मध्ये विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, बिल्डर्सनी पाणीपुरवठा न केल्यास त्यांची यादी सादर करण्याचे निर्देश होते. मात्र, एप्रिल २०२६ पर्यंत ही यादी सादर न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तसेच अनधिकृत नळजोडण्या तोडण्याची कारवाई, प्रलंबित नवीन कनेक्शन अर्ज, तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळांतील सातत्याचा अभाव या मुद्द्यांवरही नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
टँकरवर अवलंबित्व; कोट्यवधींचा अतिरिक्त बोजा
पाणीटंचाईमुळे हौसिंग सोसायट्यांना दरवर्षी १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत खर्च करून टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. टँकरमधील पाण्याचा स्रोत काय, आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा कोण करतो, याबाबतही नागरिकांनी संशय व्यक्त केला. काळेवाडी कस्पटेवस्ती येथील पाण्याच्या टाकीच्या उभारणीस ७ ते ९ वर्षांचा विलंब का झाला, याबाबत अधिकाऱ्यांकडून स्पष्ट उत्तर मिळाले नाही. तसेच शहरात नव्याने मंजूर झालेल्या १ ते २ लाख निवासी युनिट्ससाठी पाणीपुरवठ्याची तरतूद कशी केली जाणार, हा प्रश्नही अनुत्तरितच राहिला. महापालिका अधिकाऱ्यांनी शहराची सध्याची पाणीपुरवठा क्षमता ६७० MLD असल्याचे सांगितले, तर प्रत्यक्ष गरज सुमारे ८०० ते ८१० MLD इतकी असल्याची कबुली दिली. उन्हाळ्यात तांत्रिक अडचणी, नैसर्गिक कारणे आणि वाढती मागणी यामुळे समस्या तीव्र होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही तूट भरून काढण्यासाठी ठोस कृती आराखडा सादर करण्यात आला नाही.
१-२ मे रोजी महापालिकेवर मोर्चा?
ड- क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २५, २६, २८ आणि २९ मधील एकूण १६ पैकी केवळ एकमेव नगरसेवक राहूल कलाटे बैठकीला उपस्थित होते. या महत्त्वाच्या बैठकीस प्रभागातील बहुतांश नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजीची लाट उसळली. स्थानिक लोकप्रतिनिधींनीच पाठ फिरवल्याने प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे. काही नागरिक आणि उपस्थित प्रतिनिधींनी न्यायालयीन मार्ग टाळून संवादातून तोडगा काढण्याची भूमिका मांडली. मात्र, वारंवार आश्वासनांनंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या नेतृत्वाखाली १ किंवा २ मे २०२६ रोजी महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवडमधील पाणी प्रश्न आता केवळ तक्रारींपुरता मर्यादित न राहता आंदोलनाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर येत्या काळात हा प्रश्न अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. आम्ही ९ सोसायट्यांच्या पाणी समस्यांसंदर्भातील निवेदने महापालिका अधिकाऱ्यांना सादर केली आणि त्यावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली. तसेच बैठकीचा अहवाल पुणे विभागीय आयुक्तांकडे त्वरीत पाठवण्याचेही अधिकाऱ्यांना स्मरण करून दिले आहे. आम्ही सोसायटीधारक आता आंदोलन करण्याच्या भूमिक आहे.
– सचिन लोंढे, उपाध्यक्ष, सोसायटी फेडनेशन.





