निगडीत ‘आंबा महोत्सवा’चा गोडवा
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर थेट बागेतील हापूस उपलब्ध

पिंपरी-चिंचवड | उन्हाळ्याच्या आगमनाबरोबरच फळांचा राजा असलेल्या आंब्याची चाहूल लागताच नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निगडी प्राधिकरणातील नागरिकांची हीच आवड ओळखून बिग इंडिया अप्पूघर रोड येथे भव्य ‘आंबा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन बुधवारी पार पडले.
या महोत्सवाचे उद्घाटन उपमहापौर सौ. शर्मिलाताई राजेंद्र बाबर आणि नगरसेवक श्री. अमित राजेंद्र गावडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नागरिकांना थेट बागेतून आणलेले, नैसर्गिकरीत्या पिकवलेले दर्जेदार हापूस आंबे उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने स्थानिकांच्या आग्रहास्तव हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

हेही वाचा : पाणीटंचाईचा प्रश्न चिघळला : सोसायटीधारकांच्या तोंडाला प्रशासनाने पाने पुसली!
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, शहरात विविध ठिकाणी आंबे उपलब्ध असले तरी थेट बागेतून ग्राहकांपर्यंत पोहोचणारा हा उपक्रम गुणवत्ता आणि विश्वासार्हतेची खात्री देणारा आहे. या कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. दिनेश गोविंद लिंगावत, श्री. संजय महादेव शेटे आणि श्री. नामदेव रामकृष्ण पटनाईक यांनी विशेष परिश्रम घेतले असून, त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम साकार झाला आहे.
महोत्सवाची वैशिष्ट्ये :
थेट बागेतून आणलेले ताजे आंबे, नैसर्गिकरीत्या पिकवलेले रसाळ हापूस, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने खास दरात उपलब्ध केली आहेत. नागरिकांकडून या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आगामी काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.





