पुढील तीन दिवस पावसाचा इशारा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Maharashtra Weather Update Rain Forecast : गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचे चटके, तापमानवाढ सहन केल्यानंतर आता पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. थोडाफार दिलासा १८ ते २० दरम्यान पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांचा गडगडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यंदा एप्रिलच्या सुरुवातीला पुण्यासह राज्यातील काही ठिकाणी गारपीट झाली होती. त्यानंतर राज्यभरातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. राज्यातील विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांत उष्णतेची लाट आहे. तसेच पुणे परिसरातील कमाल तापमान उष्णतेच्या लाटेसदृश्य आहे. त्यामुळे तीव्र ऊन्हाचे चटके, उष्मा सहन करावा लागत आहे. मात्र, आता पुन्हा हवामानात बदल होऊ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा – शक्तीपीठ महामार्ग होण्यासाठी ९० टक्के शेतकर्यांची मान्यता; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा…
वातावरणाच्या खालच्या थरात समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत वाऱ्याची खंडितता ईशान्य मध्य प्रदेशच्या चक्रीय स्थितीपासून मन्नारच्या आखातापर्यंत मराठवाडा, विदर्भामार्गे जात आहे. तसेच वातावरणाच्या मधल्या थरात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीदरम्यान प्रतिचक्रीय स्थिती कर्नाटक आणि लगतच्या महाराष्ट्रावर स्थिरावली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. तसेच १८ एप्रिल रोजी सोलापूर, धाराशीव, १९ एप्रिल रोजी सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत, तर २० एप्रिल रोजी अहिल्यानगर, पुणे, सातारा, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे, असे नमूद करण्यात आले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १८ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही जिल्ह्यातील, तसेच १९ एप्रिल रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
राज्यातील काही ठिकाणी १८ एप्रिलच्या संध्याकाळपासून मेघगर्जना, विजांचा गडकडाट, थोडा काळ जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. १९ आणि २० एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे. तसेच पुण्यात दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, तर २० एप्रिलच्या सुमारास मुंबईतही पावसाची शक्यता आहे.
– अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ





