वाल्मिक कराडच्या कुटुंबीयांनी काही तासांतच वाकड येथील अलिशान फ्लॅटचा थकीत मालमत्ता कर भरला

पिंपरी : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेल्या वाल्मिक कराडची पिंपरी चिंचवडमध्ये मालमत्ता असल्याचं समोर आलं होतं. वाकड येथील पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीत असलेल्या फ्लॅटचा मालमत्ता कर वाल्मिक कराडने थकवल्याची माहिती काल (बुधवारी) समोर आली होती. या फ्लॅटचा लिलाव करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरु केली होती. यानंतर काही तासांतच १ लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा थकलेला कर भरण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.
वाल्मिक कराडचे पिंपरी चिंचवडमध्ये दोन अलिशान फ्लॅट असल्याची आणि त्या फ्लॅटचा कर थकवल्याची माहिती समोर आली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेने वाल्मिक कराडच्या एका फ्लॅटला नोटीस बजावली होती. तसेच लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. ही बातमी समजल्यावर कराड याच्या कुटुंबियांची धावपळ उडाली. त्यांनंतर काही तासांतच कराड कुटुंबीयांनी दोन्ही फ्लॅटचा थकीत कर भरुन टाकला. पार्क स्ट्रीट सोसायटीत जून २०२१ मध्ये ४ बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला. वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे असलेल्या अलिशान फ्लॅटचा आत्तापर्यंत एक रुपयांचा ही कर अदा करण्यात आला नव्हता. या फ्लॅटचा १ लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा कर थकलेला होता. जो आता भरण्यात आला आहे.
हेही वाचा – शिवरायांच्या नावाने आयोजित क्रीडा स्पर्धांना १ कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
तर एप्रिल २०१६ मध्ये पिंक सिटी रोडवरील मि कासा बिला सोसायटीतील टू बीएचके खरेदी करण्यात आला होता. मंजली कराडांच्या नावे असणाऱ्या फ्लॅटचा कर मात्र नियमित भरला जायचा, परंतु चालू वर्षाचा कर थकीत होता. २० हजार ६७१ पैकी ९ हजार ६८७ रुपयांचा पहिला हफ्ता भरण्यात आला आहे. कराड कुटुंबीयांनी हे दोन्ही थकीत कर ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात आले आहेत अशी माहिती आहे.





