पिंपरी-चिंचवडच्या ध्रुव मर्दीकरची आंतरराष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी
शिक्षण विश्व: इंग्रजी भाषेतील सर्वांगीण कौशल्याची झळाळी; राष्ट्रीय स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय यशाकडे झेप

पुणे | पिंपरी-चिंचवडमधील दहा वर्षीय ध्रुव मर्दीकर याने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत MaRRS Rediscover आयोजित स्पेलिंग बी स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला आहे. ही स्पर्धा २६ एप्रिल रोजी मुंबईतील जीसीसी इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडली.
बालवाडी येथील VIBGYOR हाय स्कूलचा विद्यार्थी असलेल्या ध्रुवने कठीण आणि बहुपर्यायी फेऱ्यांतून उत्कृष्ट कामगिरी करत हे यश मिळवले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेवरील पकड विविध अंगांनी तपासण्यात आली. स्पेलिंग अचूकता, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, पार्ट्स ऑफ स्पीच, फोनिमिक स्क्रिप्ट ओळख तसेच श्रवण कौशल्ये या बाबींवर आधारित प्रश्नांमुळे स्पर्धेची पातळी उच्च होती.

हेही वाचा
निगडीत थरार..! नशेत तरुणाचा हायटेन्शन खांबावर तीन तास ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा
देशभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामुळे ही स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरली. लहान वयात ध्रुवने मिळवलेले हे यश त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाचे द्योतक मानले जात आहे.
पुनावळे येथील पुणेव्हिले सोसायटीत राहणाऱ्या ध्रुवच्या यशाबद्दल त्याच्या कुटुंबीयांनी आणि शाळेने आनंद व्यक्त केला आहे. ध्रुवच्या पालकांनी सांगितले की, या यशामुळे त्याला पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळेल. ध्रुवच्या या यशामुळे VIBGYOR हाय स्कूल, बालवाडी तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील विद्यार्थी समुदायात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, इतर विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्टता साधण्याची प्रेरणा मिळत आहे.
“ध्रुवने मिळवलेले हे यश आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. त्याने सातत्याने मेहनत घेतली आणि प्रत्येक टप्प्यावर लक्ष केंद्रित केले. या यशामुळे त्याला पुढे आणखी शिकण्याची आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची प्रेरणा मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही त्याच्या प्रयत्नांना नेहमीच पाठिंबा देत राहू.”
– ध्रुव मर्दिकर याचे पालक.





