बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं अन् प्रकृती बिघडली; मुंबईत चौघांचा संशयास्पद मृत्यू

मुंबई | मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिर्याणी खाऊन घरी आल्यानंतर कलिंगड खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
अब्दुल्ला डोकाडिया (४०), नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या मुली आयशा (१६) व झैनब (१३) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी (२५ एप्रिल) रात्री हे कुटुंब जेवणासाठी बाहेर गेले होते. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर त्यांनी कलिंगड खाल्ले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.
हेही वाचा
निगडीत थरार..! नशेत तरुणाचा हायटेन्शन खांबावर तीन तास ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा
शेजाऱ्यांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी सर्वात आधी धाकटी मुलगी झैनबचा मृत्यू झाला. त्यानंतर आई नसरीन आणि मोठी मुलगी आयशा यांनीही उपचारांना प्रतिसाद दिला नाही. रात्री उशिरा कुटुंबप्रमुख अब्दुल्ला यांचाही मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून कुटुंबीयांनी मृत्यूमागचे नेमके कारण शोधण्याची मागणी केली आहे. सर्व पाहुण्यांनी बिर्याणी खाल्ली होती; मात्र संबंधित कुटुंबाने कलिंगड खाल्ल्यामुळे त्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कलिंगड खाल्ल्याने नऊ जणांचा मृत्यू झाल्याची चर्चा चुकीची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तपास सुरू असून फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.





