निगडीत थरार..! नशेत तरुणाचा हायटेन्शन खांबावर तीन तास ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा

पिंपरी-चिंचवड | शहरातील निगडी परिसरात एक धक्कादायक आणि तितकीच थरारक घटना घडली. मानसिक अस्वस्थ आणि नशेत असलेल्या एका तरुणाने थेट हायटेन्शन वीज खांबावर चढून तब्बल तीन तास गोंधळ घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण नशेच्या अवस्थेत अचानक वीज खांबावर चढला आणि टोकावर जाऊन बसला. त्या वेळी वीजपुरवठा सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते.
हेही वाचा
पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे भारतीय विद्यापीठ संघाची ऐतिहासिक सभा
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तत्काळ वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता खांबावर चढून त्या तरुणाला सुरक्षित खाली उतरवले. जवळपास अडीच ते तीन तास चाललेल्या या थरारानंतर अखेर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.





