बालवाडीतील मुलांचे मानसशास्त्र समजून घेणे गरजेचे – शिक्षिका उमा तायडे
शिक्षण विश्व : बालवाडीतील ३ ते ६ वर्षे हा मुलांच्या आयुष्यातील संवेदनशील आणि महत्त्वाचा टप्पा

पिंपरी चिंचवड : बालवाडीतील ३ ते ६ वर्षे हा मुलांच्या आयुष्यातील अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा टप्पा असून या वयात मुलांवर अभ्यासाचा ताण देणे टाळावे, असे प्रतिपादन प्रियदर्शनी शाळेच्या शिक्षिका उमा तायडे यांनी केले.
शिक्षिका उमा तायडे म्हणाल्या की, या वयातील मुले अभ्यासापेक्षा खेळ, संवाद, गोष्टी व दैनंदिन अनुभवांतून अधिक प्रभावीपणे शिकतात. मुलांची एकाग्रता मर्यादित वेळेसाठीच असते. त्यामुळे त्यांना जास्त वेळ बसवणे, नीट लिहिण्याचा आग्रह धरणे किंवा इतर मुलांशी तुलना करणे योग्य नाही. अशा अपेक्षांमुळे मुलांमध्ये भीती, तणाव आणि दडपण निर्माण होऊ शकते. प्रत्येक मूल वेगवेगळ्या गतीने शिकते व वाढते. मुलांची तुलना केल्यास त्यांच्या भावनिक विकासावर विपरीत परिणाम होतो, असेही तायडे यांनी स्पष्ट केले. प्रेम, प्रोत्साहन आणि संयम मिळाल्यास मुले सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण बनतात.
हेही वाचा – ‘घड्याळ’’ तेच… फक्त वेळ नवी! : आशा तानाजी भोंडवे
आनंदी मूल लवकर शिकते, असे नमूद करताना त्या म्हणाल्या की चुका करणे हा शिकण्याचा नैसर्गिक भाग आहे. पालकांनी केवळ निकालांवर लक्ष केंद्रित न करता मुलांच्या प्रयत्नांचे आणि छोट्या प्रगतीचे कौतुक केले पाहिजे. बालवाडीची वर्षे ही आत्मविश्वास, जिज्ञासा आणि चांगल्या सवयी घडवण्याची पायाभरणी करणारी असतात. मुलांना प्रेम आणि आधार मिळाल्यास शिकण्याची प्रक्रिया सहज आणि आनंददायी होते, असे मत शिक्षिका उमा तायडे त्यांनी व्यक्त केले. शैक्षणिक यशापेक्षा मुलांचा भावनिक व मानसिक विकास अधिक महत्त्वाचा असून पालकांनी मुलांवर तसेच स्वतःवरही अनावश्यक ताण टाकू नये, असे आवाहन उमा तायडे यांनी केले.





