“मी माझा शब्द पाळला…”; मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सिद्धरामय्या भावुक

Siddaramaiah | गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या वेगवान राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याच्या चर्चांदरम्यान, आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा अधिकृत राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी हे पाऊल उचलल्याने आता उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता गडद झाली आहे.
गुरुवारी सकाळी बेंगळुरू येथे आयोजित एका महत्त्वपूर्ण ‘ब्रेकफास्ट मीटिंग’मध्ये सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर राजीनामा देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार, आज दुपारी त्यांनी थेट ‘लोकभवन’ गाठले. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हे सध्या वैयक्तिक कारणास्तव राज्याबाहेर असल्याने, सिद्धरामय्या यांनी राज्यपालांचे सचिव प्रभू शंकर यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला.
“मी माझा शब्द पाळला…”
राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. “मी माझा शब्द पाळला आहे,” असे सांगत त्यांनी सर्वांनाच चकित केले. विशेष म्हणजे, आपण राष्ट्रीय राजकारणात जाण्यास उत्सुक नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यामुळे दिल्लीतील काँग्रेस हायकमांडने त्यांना दिलेली राज्यसभेची ‘ऑफर’ त्यांनी नाकारल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा
हाऊसिंग फेडरेशनची पोलीस आयुक्तांसह उच्चस्तरीय बैठक
पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने मला राजीनामा देण्यास सांगितले, त्यानुसार मी आज माझा राजीनामा सादर केला आहे. राज्यपाल जेव्हा लोकभवनमध्ये परततील, तेव्हा ते हा राजीनामा स्वीकारतील अशी मला खात्री आहे; कारण संविधानानुसार हे आवश्यक आहे. आमच्याकडे राज्यात पूर्ण बहुमत आहे, त्यामुळे नवीन मुख्यमंत्र्यांना सरकार स्थापन करण्याची परवानगी देणे घटनात्मक ठरेल. मला मुख्यमंत्री पदाची संधी दिल्याबद्दल मी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”
डी. के. शिवकुमार यांच्याकडे राज्याची धुरा?
सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात सुरू असलेल्या सुप्त सत्तासंघर्षाचा अंक संपला आहे. हायकमांडच्या सूचनेनुसार सिद्धरामय्या यांनी सन्मानजनक माघार घेतली असली, तरी केंद्रात जाण्यास नकार दिल्याने त्यांचे पुढील पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नवीन विधीमंडळ गटनेता निवडीसाठी लवकरच काँग्रेस आमदारांची बैठक होणार असून, डी. के. शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची दाट शक्यता आहे.





