खान्देश रहिवासी संघाचा प्रभाग ५ मधील भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा
मिशन- PCMC : सर्व समाजघटकांना सोबत घेवून काम करु : कविता भोंगाळे

पिंपरी-चिंचवड | शाकंभरी पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी भोसरी येथील दुर्वांकुर लॉन्समध्ये खान्देश रहिवासी संघाच्या वतीने भव्य भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात धुळे, शिरपूर आणि पुणे येथील सुप्रसिद्ध कलाकार सागर देशमुख, दिलीपभाऊ बाशिंगे, राम–श्याम बाशिंगे यांच्यासह गोल्डन बँड ‘कानुबाई फ्रेंड्स सर्कल’ यांनी कानुबाई मातेवरील भक्तीगीतांचे सादरीकरण केले, ज्यामुळे उपस्थितांची मनं मंत्रमुग्ध झाली.
कार्यक्रमात खान्देशातील विविध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रसंगी खान्देश रहिवासी संघाच्या वतीने भोसरी परिसरातील प्रभाग क्रमांक ५ मधील भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. हा पाठिंबा भोसरी शहराचे कार्यसम्राट आमदारांचे बंधू व कामगार नेते सचिनभैय्या लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आला.
कार्यक्रमात जालिंदर बापू शिंदे, सागरभाऊ गवळी, कविता भोंगाळे आणि अनुराधा गोफणे यांनी आपली मनोगते व्यक्त करत विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यांनी आगामी ५० वर्षांच्या विकासाचा दूरदृष्टीपूर्ण आराखडा मांडून प्रभागातील विविध सुरू असलेल्या विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली.
हेही वाचा : पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभाग अवघा ‘‘भाजपामय’’
विकासासाठी वचन
“आम्ही खान्देश समाजाच्या प्रत्येक गरजेशी नेहमी हाकेसरशी उभे राहू. विकासासाठी कोणतीही संधी वाया जाणार नाही, आणि प्रत्येक निर्णय समाजाच्या भल्यासाठी घेण्यात येईल.” असे आश्वासन कविता भोंगाळे यांनी दिले. प्रभागातील चारही भाजप उमेदवारांनी खान्देश समाजबांधवांसाठी सदैव सेवा देण्याची ग्वाही दिली. यावेळी पिंपरी–चिंचवड विकास मंडळाचे अध्यक्ष तसेच भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मनोजजी ब्राम्हणकार यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित खान्देशवासीयांच्या वतीने पिरनभाऊ गवळी, गोकुळ सोनजे, सोमनाथ महाजन, शामभाऊ माळी, राजेंद्र अमृतकार, मकरंदभाऊ खैरनार, प्रमोद माकडे, भगवान पाटील, मुरलीधर पाटील, सचिनजी देव, विनोद शेठ नानकर आणि गोपाळ वानखेडे यांनी पाठिंबा पत्रक देऊन उमेदवारांचे आभार व्यक्त केले.
आम्ही खान्देश समाजाच्या प्रत्येक गरजेशी नेहमी हाकेसरशी उभे राहू. विकासासाठी कोणतीही संधी वाया जाणार नाही, आणि प्रत्येक निर्णय समाजाच्या भल्यासाठी घेण्यात येईल.
– कविता भोंगाळे,उमेदवार, भाजपा, प्रभाग- 5.






