Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दारिद्र्यरेषेखालील महिलांसह मुलींना मोफत कर्करोग प्रतिबंधक लस (एचपीव्ही) देण्यात येणार

सांगवी : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील महिला आणि ९ ते १४ वयोगटातील मुलींना मोफत एचपीव्ही लस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अखेर घेण्यात आला आहे. या निर्णयासाठी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली.

महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनांचा कर्करोग मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, किशोरवयीन मुलींना एचपीव्ही लसीकरणाच्या माध्यमातून संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरणासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीचा समन्वयाने वापर केला जाणार असल्याची माहिती मंत्री आबिटकर यांनी दिली.

हेही वाचा –  परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती; २४ विद्यार्थ्यांची निवड

महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा ठरणारा हा निर्णय घेतला जावा, यासाठी आमदार शंकर जगताप यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे सांगवी येथील अटल महाआरोग्य शिबिरात केली होती. त्याबरोबरच लेखी पत्र पाठवूनही त्यांनी मागणीचा पाठपुरावा केला होता. राज्यातील शाळांमधूनच एचपीव्ही लसीकरण मोफत करण्यात यावे, अशी त्यांची ठाम भूमिका होती. महिलांनी लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यापूर्वी ही लस घेतल्यास कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे मुलींना सहा ते बारा महिन्यांच्या कालावधीत दोन डोस देण्याच्या उपक्रमास प्राधान्य देण्यात यावे, असेही त्यांनी सुचवले होते.

दरम्यान, जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यभरात अडीच कोटी महिलांसाठी आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या शिबिरांमध्ये २१ लाख ४८ हजार ४३५ महिलांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ८९२ महिलांना कर्करोगाचे निदान झाले आहे. त्यांना तातडीने पुढील उपचार देण्यात येत आहेत.

कर्करोग रोखण्यासाठी लसीकरणासोबतच जागरूकता आणि नियमित तपासणी आवश्यक आहे. आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम अधिक वेगाने पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button