परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती; २४ विद्यार्थ्यांची निवड

पुणे : राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजना सन २०२४-२५ साठी २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. शासनामार्फत परदेश शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण संपल्यानंतर त्यांच्या ज्ञानाचा फायदा देशाला करून देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने संबंधित विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती मंजूर करण्यापूर्वी हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे.
अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठात प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून त्यांना वंचित राहावे लागते. अल्पसंख्याक समुदायातील मुलांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा, यासाठी शासनाकडून परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे.
हेही वाचा – महिला दिन हा माँ जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला पाहिजे, राज ठाकरेंची मागणी
त्यानुसार महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थी पदव्युतर पदवी आणि डॉक्टरेट अभ्यासक्रमासाठी २०० क्यूएस वर्ल्ड रॅकिंगच्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील, अशा एकूण ७५ विद्यार्थ्यांची योजनेंतर्गत निवड करून त्यांना परदेश शिष्यवृत्ती मंजूर होणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २४ पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.
२३ पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी व १ डॉक्टरेट अभ्यासक्रमाचा विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. परदेश शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी समाजकल्याण आयुक्तांना अधिकार देण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करूनच संबंधित विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.