अचानक मेट्रो बंद झाल्याने प्रवाशांचे हाल; डिस्ट्रिक्ट कोर्ट स्टेशन वरील प्रकार

पिंपरी : डिस्ट्रिक्ट कोर्ट येथून पुढे वनाजच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोच्या फेऱ्या अचानक रद्द करण्यात आल्याने शेकडो प्रवाशांचे हाल झाले. रामवाडीहून आलेल्या नागरिकांना डिस्ट्रिक्ट कोर्ट येथे उतरून रिक्षा व कॅबने पुढील प्रवास करावा लागला. हिच परिस्थिती छत्रपती संभाजी उद्यान स्टेशनवरील प्रवासाची झाली. त्यांना तेथून पुढे रामवाडीच्या दिशेने जाता आले नाही.
हेही वाचा – दारिद्र्यरेषेखालील महिलांसह मुलींना मोफत कर्करोग प्रतिबंधक लस (एचपीव्ही) देण्यात येणार
त्याबाबत स्टेशनवर कोणतीही उद्घोषणा करण्यात न आल्याने प्रवाशांचे हाल झाले आहे. डिस्ट्रिक्ट कोर्ट स्टेशनवर आलेली मेट्रो मागे फिरवण्यात आली. सुरक्षारक्षकाने प्रवाशांना खाली उतरवले. तेव्हा मेट्रो पुढे जाणार नाही हे नागरिकांना समजले. मात्र, उद्घोषणा वनाजकडे मेट्रो जाणार अशी केली जात होती. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. हा प्रकार दुपारी एकपासून सुरु होता. पीएमसी स्टेशन येथे आंदोलन सुरु असल्याने मेट्रो पुढे सोडली जात नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.