मुख्यमंत्री विजय यांची पहिली माघार; ज्योतिषी राधन पंडित यांची ‘ओएसडी’ पदावरील नियुक्ती रद्द

Vijay Thalapathy | तामिळनाडूच्या राजकारणात सत्ता स्थापन होताच मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी आपला पहिला मोठा प्रशासकीय निर्णय मागे घेतला आहे. त्यांचे निकटवर्तीय आणि ज्योतिषी राधन पंडित वेट्रिवेल यांची ‘विशेष कार्य अधिकारी’ (OSD) पदावरील नियुक्ती अवघ्या काही तासांत रद्द करण्यात आली आहे. मित्रपक्षांचा तीव्र विरोध आणि विधानसभेतील गदारोळानंतर मुख्यमंत्री विजय यांनी हा निर्णय घेतला.
राधन पंडित वेट्रिवेल हे केवळ मुख्यमंत्र्यांचे ज्योतिषीच नाहीत, तर त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या विजयाची भविष्यवाणीही केली होती. प्रचारादरम्यान त्यांनी पक्षाचे प्रवक्ते आणि विश्वासू सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली होती. विशेष म्हणजे, ४ मे रोजी मतमोजणी सुरू असताना जेव्हा ‘टीव्हीके’ आघाडीवर होती, तेव्हा विजय यांची भेट घेणारी राधन पंडित ही पहिलीच व्यक्ती होती. याच ऋणानुबंधातून त्यांची ओएसडी पदी नियुक्ती करण्यात आली होती.
हेही वाचा
या नियुक्तीची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठली. सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसचे खासदार शशिकांत सेंथिल यांनी “एका ज्योतिषाला ओएसडी पदाची गरजच काय?” असा सवाल करत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. तर बुधवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी देखील हा मुद्दा चांगलाच गाजला. व्हीसीके (VCK) आमदार वन्नी अरासु यांनी “सरकारने ज्योतिषावर नाही, तर विज्ञानावर लक्ष केंद्रित करावे” असा टोला लगावला, तर डीएमडीके (DMDK) ने या नियुक्तीला जनतेचा अपमान म्हटले.
गदारोळानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय
विधानसभेत विरोधक आणि मित्रपक्षांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून मुख्यमंत्री विजय यांनी नमती भूमिका घेतली. सभागृहात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, प्रेमलता विजयकांत आणि इतर नेत्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा ते गांभीर्याने विचार करतील. या भाषणानंतर अवघ्या एका तासात सरकारने अधिकृत आदेश जारी करून राधन पंडित यांची नियुक्ती रद्द केल्याचे जाहीर केले.





