तीन वेगवेगळ्या नावांनी वास्तव्य करणारा बांगलादेशी घुसखोर गजाआड
भोसरी पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये आवळल्या मुसक्या

पिंपरी- चिंचवड : तीन वेगवेगळ्या नावांनी पिंपरी चिंचवड शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्या एका बांगलादेशी घुसखोराला भोसरी पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई रविवारी (दि. २३) रात्री साडेआठच्या सुमारास भोसरी येथे बनाचा ओढ्याजवळ करण्यात आली.
नयन रतन सरकार (वय २१, रा. क्रिष्णापूर, लोहागारा, जि. नराईल, बांगलादेश, सध्या रा. लेबर कॅम्प, दिघी) असे अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोराचे नाव आहे. पोलीस शिपाई सुयोग लांडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी नयन याच्याकडे राकेश रतन सरकार (रा. घोला नादिया, पश्चिम बंगाल) या नावाचे आधारकार्ड, सुमित शंकर भक्ता (रा. नाकाशी पारा, पश्चिम बंगाल) या नावाचे मतदान कार्ड अशी कागदपत्रे आढळून आली. त्याचे मूळ नाव नयन सरकार असे आहे. मात्र, तीनही कागदपत्रांवर त्याचाच फोटो आहे. तो सध्या दिघीतील लेबर कॅम्प येथे वास्तव्य करत होता. त्याने बांगलादेशमधून पश्चिम बंगालमध्ये अवैधपणे घुसखोरी केली. त्यानंतर तो कामाच्या निमित्ताने पुण्यात आला. भोसरी पोलिसांकडून दररोज रात्री सहा ते नऊ या कालावधीत नाकाबंदी लावली जाते. रविवारी नाकाबंदी सुरु असताना एक दुचाकीस्वार संशयितपणे जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
हेही वाचा : महाशिवरात्रीनिमित्त आयोजित त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध
पोलिसांनी दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात तफावत आढळून आली. त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या नावाची कागदपत्रे आढळून आली. तसेच, तो बांगलादेशी असल्याचे निदर्शनास आले. पश्चिम बंगाल मधील नादिया येथील भारतीय मतदान कार्ड, बांगलादेश येथील लोहागारा, जि. नराईल येथील लक्ष्मीपाशा आदर्श सेकंडरी स्कुल या शाळेचा दाखला आढळून आला.
नयन सरकार याच्यावर परकीय नागरिक आदेश, परकीय नागरिक कायदा यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गेल्या एक वर्षापासून पिंपरी – चिंचवड शहरात बेकायदेशीर वास्तव्य करत आहे. तसेच, मेस आणि कन्स्ट्रक्शन साईटवर काम करत होता. नयन सरकार याला न्यायालयात हजर केले असता त्याला २७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. फौजदार श्रीकांत गुरव तपास करीत आहेत.