रस्त्याच्या बाजूची जागा कचरामुक्त करून बनवला ‘सेल्फी पॉईंट’!
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अनोख्या उपक्रमाचे कौतुक

पिंपरी- चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने विविध उपक्रम सुरू केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी असा परिसर स्वच्छ करून तेथे ‘सेल्फी पॉईंट’ केले जात आहेत. अशा जागांवर सेल्फी काढण्यासाठी नागरिकांचीही लगबग वाढू लागली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सार्वजनिक जागा कचरामुक्त करीत तो परिसर सुंदर करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक २३ येथील संजीवनी बिल्डींग कॉर्नर येथील परिसर कचरामुक्त करत तो परिसर सुशोभित केला आहे.
कचऱ्यातील टाकाऊ टायरचा तसेच झाकणाचा वापर करत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी परिसर कचरामुक्त करत सुंदर ‘सेल्फी पाईंट’ तयार केलाय. तसेच आजबाजूच्या परिसराची स्वच्छता करून त्या जागेला आकर्षक बनवण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी देखील आरोग्य विभागाच्या या कामाचे कौतुक केले असून सगळ्यांसाठी हा सेल्फी पाईंट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय.
हेही वाचा : महाशिवरात्रीनिमित्त आयोजित त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध
उपआयुक्त सचिन पवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महापलिका क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी कुंडलिक दरवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक शशिकांत मोरे, आरोग्य निरीक्षक गणेश राजगे, आरोग्य सहाय्यक सचिन उघडे यांच्यासह आरोग्य विभागातील इतर कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.
पिंपळे गुरव येथे ”वेस्ट टू आर्ट’
पिंपळे गुरव येथील महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक २९ मधील विजयनगर बस स्टॉप येथील ठिकाण संपूर्ण कचरामुक्त करून त्या परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. टाकाऊ वस्तूंचा वापर करून ‘वेस्ट टू आर्ट’ संकल्पनेंतर्गत खराब झालेले टायर, पुठ्ठा, मातीचा माठ, टाकाऊ सिमेंटचे पाईप यांचा उपयोग करून आकर्षक सेल्फी पॉईट तयार करण्यात आला आहे. तसेच येथे आरोग्य व पर्यावरण विषयक जनजागृती करणारे सामाजिक संदेश लिहिण्यात आले आहेत.
या उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसापासून येथे कचरा टाकणे बंद झाले असून स्थानिक नागरिकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. हा परिसर कचरामुक्त करण्यासाठी आरोग्य अधिकारी शांताराम माने, मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे, योगेश फल्ले, आरोग्य निरीक्षक प्रणय चव्हाण यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.