मुंबईत रेल्वेची धडक कारवाई! वांद्रे स्थानक परिसरातील अवैध बांधकामे जमीनदोस्त

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) आदेशानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने पालिकेच्या मदतीने वांद्रे येथील ‘गरीब नगर’ परिसरात भव्य अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली आहे. रेल्वेच्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यासाठी आज, १९ मे पासून या कारवाईला सुरुवात झाली असून ती २३ मे पर्यंत (पाच दिवस) चालणार आहे. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ५ मे रोजी पश्चिम रेल्वे परिसरातील बेकायदेशीर बांधकामे हटविण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने ही धडक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, न्यायालयाने २०२१ च्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या झोपडीधारकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे निर्देशही दिले आहेत.

हेही वाचा
‘तरुण भारत संवाद’ चे विश्वास दिवे यांना उत्कृष्ट उपसंपादक पुरस्कार!
४०० जवान, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका तैनात
अतिक्रमण हटवताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस (RPF) आणि जीआरपी (GRP) चे तब्बल ४०० जवान या परिसरात तैनात आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या (अग्निबंब), रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या असून संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
किरीट सोमय्या यांनी केली पाहणी
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वांद्रे टर्मिनस येथील गरीब नगर परिसरात स्वतः भेट देऊन या कारवाईची पाहणी केली. या कारवाईबद्दल त्यांनी पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. वांद्रे टर्मिनस परिसरातील बांगलादेशी नागरिकांचे बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.





