‘मोदी-शाह जाताना देशाचे तुकडे करणार’, संजय राऊतांची जळजळीत टीका; ‘मटण हृदयसम्राट’ म्हणत नितेश राणेंवर साधला निशाणा

Sanjay Raut : मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटवण्यापासून ते मटणांच्या दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यावरून आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ‘मोदी-शाह हे जाताना देशाचे तुकडे करून जातील. हिंदू-मुसलमानांसाठी स्वतंत्र दुकानांची मागणी हा ठरवून सुरू असलेला मूर्खपणा भारताला हिंदू पाकिस्तानच्या दिशेने ढकलत आहे’, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.
दैनिक ‘सामना’तील रोखठोक या सदरातून संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य करत भाजप, पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
रोखठोक सदरात संजय राऊत यांनी लिहिले की, मोदी काळाचे आता अंतिम पर्व सुरू झाले आहे. मोदी व त्यांचे लोक केव्हा तरी जातील, पण जाताना या देशाचे तुकडे करून जातील हे स्पष्ट दिसते. देशात आज जो जातीय आणि धार्मिक विद्वेष वाढला आहे तो ‘फाळणी’आधी याच पद्धतीने दिसत होता.
धर्माच्या आधारावर निर्माण झालेली अनेक राष्ट्रे कोसळून पडली. त्यात पाकिस्तान आहेच. पंडित नेहरूंसारख्या लोकांनी या देशाचे हिंदू पाकिस्तान होऊ दिले नाही म्हणून हा देश टिकला, पण मोदी काळात देश पुन्हा नव्या फाळणीच्या दिशेने ढकलला जात आहे. हिंदू पाकिस्तानच्या दिशेने आपण निघालो आहोत काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा – एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी ‘या’ नेत्याला देणार संधी
संजय राऊत यांनी लिहिले की, मुसलमानांच्या कुरापती काढून त्यांना भडकविण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम राबवला जात आहे, तो धक्कादायक आहे. दुबईत भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्राफी अंतिम सामन्यात भारत विजयी झाला. त्यानंतर ठिकठिकाणी भाजपच्या समर्थकांनी विजयी मिरवणुका काढल्या. या मिरवणुका रात्रीच्या वेळी मुद्दाम मशिदीसमोर आणून तेथे गोंधळ घालणे, जोरजोरात वाद्ये वाजविणे, मुसलमानांच्या विरोधात घोषणा देणे असले प्रकार सुरू झाले. मध्य प्रदेशातील महू येथे यामुळे दोन गटांत दंगल उसळली. त्याचे पडसाद इतरत्र उमटले. विजय उत्सव साजरा करण्याची ही पद्धत नाही, पण हे प्रकार सातत्याने घडवून देशात दंगलीचा भडका उडविण्याचे कारस्थान रचले जात आहे.
मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्रात हिंदूंसाठी व मुसलमानांसाठी स्वतंत्र मटणाची दुकाने निर्माण करण्याचे जाहीर केले, हे श्री. भागवत यांना मान्य आहे काय?, असा सवाल संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारला.
उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुसलमान माफिया आणि गुंडांचे एन्काऊंटर सुरू आहे, पण योगी ज्या जातीचे आहेत त्या जातीच्या गुंड आणि माफियांना पूर्ण अभय आहे. म्हणजे हिंदू माफियांनी हिंदूंना लुटण्याचा पूर्ण अधिकार भाजपशासित राज्यात आहे. भाजपचे बंगालमधील नेते सुवेंदू अधिकारी सांगतात, ‘मुस्लिम आमदारांना राज्याच्या विधानसभेतून उचलून बाहेर फेका.’ हीच भाजपच्या हिंदू राष्ट्राची म्हणजे हिंदू पाकिस्तानची सुरुवात आहे काय? हिंदू हा सहिष्णू, संयमी, संस्कारी आहे, पण कोणी उगाच अंगावर आला की त्यांना सोडत नाही.
महाराष्ट्रात हिंदूंसाठी मटणाची वेगळी दुकाने, पण मुंबईत मंगलप्रभात लोढांसारखे अनेक बिल्डर मटण खाणाऱ्या हिंदूंना त्यांच्या गृहसंकुलात पाय ठेवू देत नाहीत व जागा नाकारल्या जात आहेत. त्यावर हे ‘मटण’वाले ‘बाल हिंदुहृदयसम्राट’ बोलणार आहेत काय? , असे म्हणत त्यांनी नितेश राणेंवर लेखातून निशाणा साधला. तसेच, त्यांनी राणेंचा उल्लेख अप्रत्यक्षरित्या ‘मटण हृदयसम्राट’ असा केला आहे.
महाराष्ट्रासह भारतात याच हिंदुत्ववाद्यांनी पुन्हा औरंगजेबाला जिवंत केले. राजकीय स्वार्थ त्यामागे आहे. औरंगजेब महाराष्ट्रात गाडला गेला. त्याची माती झाली. मात्र एखाद्या चित्रपटातला औरंगजेब पुन्हा समाजात उभा करणे हा शिवरायांचासुद्धा अपमान आहे, असेही ते म्हणाले.