आषाढी यात्रा संपताच उजनीतून भीमेत पुन्हा पाणी सोडणार

सोलापूर : भीमा खोऱ्यात, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर होत असलेल्या पावसामुळे खडकवासला व बंडगार्डनमधून सोडलेले पाणी दौंडमार्गे उजनी धरणात येऊन मिसळत आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढत असताना पूरनियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जात होते. परंतु आषाढी यात्रेमुळे वारकरी आणि भाविकांना चंद्रभागा नदीत स्नान करता यावे म्हणून उजनी धरणातून नदीत पाणी सोडणे थांबविण्यात आले होते. आता आषाढी यात्रा संपल्यावर लगेच धरणातून पुन्हा भीमा नदीवाटे पाणी सोडण्यात येणार आहे.
आषाढी यात्रेचा विचार करून उजनी धरणातून भीमा नदीत गेले चार पाच दिवस पाणी सोडणे थांबविण्यात आले असता दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील दौंड येथून पाण्याची येणारी आवक २० हजार क्युसेकपेक्षा आधिक आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. धरणातील पाणीपातळी समतोल राखण्यासाठी आणि धरणाचे १६ दरवाजे २० सेंटीमीटरपर्यंत वर उचलून पाणी भीमा नदीत सोडण्यात येणार असल्याची माहिती उजनी धरण प्रशासनाच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
हेही वाचा – भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ठेवलं 608 धावांचं आव्हान, गोलंदाजांची कसोटी
एकूण ११७ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात अतिरिक्त ६ टीएमसी पाणीसाठा करता येतो. गेल्या चार-पाच दिवसांपासून धरणात ७८ टक्के पाणीसाठा स्थिर ठेवून धरणातील पाणी भीमेत सोडले जात होते. परंतु आषाढी यात्रेचा विचार करता धरणातून भीमेत पाणी सोडणे बंद करण्यात आले होते. दरम्यान, दौंड येथून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढतच असल्यामुळे सध्याच्या जुलै महिन्यातच संपूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचा विचार करता धरणातील पाणी भीमा नदीत सोडण्यात येणार आहे.
सध्या धरणात एकूण १०५.९५ टीएमसी पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा ४२.३२ टीएमसी आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ७९ आहे. तर दौंड येथून येणारी पाण्याची आवक १३ हजार ४९३ क्युसेक आहे. धरणाच्या मुख्य कालव्यात १७०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. तर सीना-माढा सिंचन योजनेसाठी १२० क्युसेक, भीमा-सीना बोगद्यासाठी ९०० क्युसेक आणि दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी १०० क्युसेक याप्रमाणे पाणी सोडले जात आहे.