तेजस्विनी पंडितची मराठी कलाकारांवर टीका
मनसेच्या वतीने जल्लोष मेळाव्याचं आयोजन

मुंबई : हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज जल्लोष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. वरळी डोम याठिकाणी कार्यकर्ते जमले आहे. मराठी सेलिब्रिटी देखील ऐतिहासिक क्षणाचा साक्षिदार होण्यासाठी दाखल झाले आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने देखील विजयी मेळाव्यासाठी उपस्थिती दर्शवली आहे…
तेजस्विनी पंडित म्हणाली, “अजून खूप मराठी माणसं जोडली गेली पाहिजेत. अजून मराठी माणसांनी एकत्र येणं बाकी आहे. मराठी-मराठीमध्येच खूप गोष्टी विभागल्या गेल्या आहेत. सर्वांत आधी महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे, महाराष्ट्रातला मराठी एकत्र यायला पाहिजे. आता लोकांनी हे जे वातावरण बिघडवलं आहे, यात बिघडण्यासारखं काहीच झालं नव्हतं. कारण आम्ही हिंदीविरोधात नाही. आम्ही सक्तीविरोधात होतो. मराठी बोलणार नाही, हा अट्टहास का? किमान शिकण्याचा तरी प्रयत्न करा,” अशी प्रतिक्रिया अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दिली.
हेही वाचा – टीकेनंतरही फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार, पण उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “रुदाली…”
समस्या असल्यास मराठी कलाकार राज ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी जातात. पण मराठी भाषेचा विषय असतो तेव्हा मोठ्या संख्येने कलाकार एकत्र का येत नाही. असा प्रश्न तेजस्विनी पंडित हिला प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मला सुद्धा असा प्रश्न पडला आहे. असं का होत नाही. इतर वेळा मदत लागते तेव्हा शिवतिर्थाचे दरवाजे ठोठावले जातात आणि जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा कलाकार का एकत्र येत नाही हा एक दुर्दैवी प्रश्न आहे.’
‘अवघा महाराष्ट्र आसुसलेला होता या दृष्यासाठी… ते दृष्य पाहण्यासाठी आज आम्ही येथे आलो होतो. मराठीचा विजय साजरा करण्यासाठी या दोन कारणांसाठी मी आज याठिकाणी आली आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.