“पंतप्रधान मोदींमुळेच पुतिन यांनी युक्रेनवरील अणुहल्ला रोखला”; पोलंडच्या मंत्र्याचा मोठा दावा!

PM Modi stopped Vladimir Putin from nuclear escalation in Ukraine : युक्रेन युद्धादरम्यान २०२२ च्या शेवटी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना धोरणात्मक अणुशस्त्रांचा वापर करण्यापासून रोखण्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा दावा पोलंडचे उपपरराष्ट्र मंत्री व्लादिस्लाव थियोफिल बार्टोशेव्स्की यांनी केला आहे. नवी दिल्लीत भारत-पोलंड संयुक्त आर्थिक आयोगाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बार्टोशेवस्की बोलत होते.
भारताचे अनेक दशकांपासून मॉस्कोबरोबर चांगले संबंध आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे अशा मोजक्या जागतिक नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांचा सल्ला पुतीन गांभीर्याने घेतात, असं बार्टोशेवस्की यांनी सांगितलं. बार्टोशेवस्की म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक अत्यंत सुप्रसिद्ध आणि आदरणीय जागतिक नेते आहेत. भारताचे रशियन फेडरेशनशी आणि त्यापूर्वी सोव्हिएत युनियनशी दीर्घकाळापासूनचे संबंध आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतीन हे प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी यांच्या बोलण्याकडे लक्ष देतात.”
पंतप्रधान मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या एका अत्यंत कठीण प्रसंगी आपल्या प्रभावाचं दर्शन घडवलं होतं, असं सांगत ते पुढे म्हणाले, “मी २०२२ च्या अखेरीस युक्रेनमध्ये पुतीन यांना धोरणात्मक अणुशस्त्रांचा वापर करण्यापासून रोखण्यात पंतप्रधान मोदींनी बजावली होती. पंतप्रधान मोदी हे अशा मोजक्या व्यक्तींपैकी एक आहेत जे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर खरोखरच काही प्रमाणात दबाव आणि प्रभाव टाकू शकतात. रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याकरता नरेंद्र मोदींनी मदत केली होती. “
हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला; “अनेकांना वाटलं होतं आपण शेतकरी कर्जमाफी करणार नाही; आंदोलन करु आणि..”
सप्टेंबर २०२२ मध्ये उझबेकिस्तानमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान पुतीन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी “आजचं युग हे युद्धाचे नाही”, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. तेव्हापासून भारताने रशियाविरुद्ध पाश्चात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांमध्ये सामील होण्यास नकार दिला असून, संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की या दोघांशीही संपर्क कायम ठेवला आहे. त्यांनी २०२४ मध्ये कीव्ह येथे आणि त्यानंतर विविध बहुपक्षीय परिषदांदरम्यान झेलेन्स्की यांची भेट घेतली आहे.
रशियासोबतचा ऊर्जा व्यापार कमी करण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय मित्रदेशांकडून सातत्याने दबाव असूनही नवी दिल्लीने रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करणं सुरूच ठेवले आहे. भारताने नेहमीच आपली तेल खरेदी ही ऊर्जा सुरक्षा आणि राष्ट्रीय हितासाठी आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी गेल्या महिन्यात भारताचा उल्लेख एक महान देश असा केला होता आणि नवी दिल्लीच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचं समर्थन केलं होतं. इराण युद्धाच्या संदर्भातही बार्टोशेवस्की यांनी भारताच्या भूमिकेचे समर्थन केले.





