उद्धव ठाकरे यांचे दोन खंदे शिलेदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत
ठाकरे गटात होणारी गळती अजूनही थांबताना दिसत नाहीये

महाराष्ट्र : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांचे दोन खंदे शिलेदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गेले आहेत. दोघेही माजी नगरसेवक आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील हे दोन्ही माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याने पश्चिम उपनगरातील शिंदे गटाची ताकद वाढली आहे. तर, गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटात होणारी गळती अजूनही थांबताना दिसत नाहीये. येणाऱ्या काळातही ही गळती सुरूच राहण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.
उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर , संजय पवार यांनी आज मुक्तागिरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या दोन्ही नगरसेवकांसोबत त्यांच्या शेकडो समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही माजी नगरसेवकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर तुफान हल्ला चढवला.
एवढे आमदार कधीही निवडून आले नाही
इंडिया जिंकली त्यांचं आपण अभिनंदन करुया. आज ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला, त्यांच स्वागत करतो. मनापासुन शुभेच्छा देतो. अडिच वर्ष महायुती सरकार काम करत होतं. लाडक्या बहिणीमुळे पुन्हा महायुती सरकार सत्तेत आलं. मुंबईत विकास होतोय, अनेक चांगले निर्णय आपण घेतले आहेत. आपले आमदार मोठ्या प्रमाणावर निवडून आले आहेत. आतापर्यंत शिवसेनेचे एवढे आमदार निवडून आले नव्हते, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा – शहरातील फेरीवाल्यांना फेरीवाला प्रमाणपत्र वाटप सुरू
तुम्ही धनुष्यबाण टाकला
आज सगळे शिवसेनेत का येत आहेत? याचा विचार करावा. आपण बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेतोय. तुम्ही सगळे खऱ्या पक्षात येता. आज काही लोक निर्धार सभा घेत आहेत. आणि सगळ्यांना सांगत आहेत की आईशी गद्दारी करु नका. पण 2019ला तुम्ही वडिलांशी गद्दारी केली. खुर्चीसाठी गद्दारी केली. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला लांब ठेवलं, त्यांच्यासमोरच तुम्ही धनुष्यबाण घाण टाकला आणि म्हणून या एकनाथ शिंदेनी उठाव केला, असा हल्लाच शिंदेंनी चढवला.
ती फतव्यांची शिवसेना
आता विनवणी कशाला करत आहात. आता किती शिल्लक राहतील माहीत नाही. तुम्ही 2019 ला सर्वसामान्यांशी बेइमानी केली. तुमच्या दांड्या जनतेने विधानसभेत गुल केल्या आहेत. आपण 80 पैकी 60 जागा जिंकलो. किती आरोप केले. शिव्या दिल्या. पण किती जागा आल्या? फक्त 20. मग खरी शिवसेना कोणाची? ती फतव्यांची शिवसेना. उठाबसा वाली ती शिवसेना, अशी जोरदार टीका त्यांनी केली.