मुंबईकरांसाठी खुशखबर: टाटा पॉवरकडून वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू

मुंबई : मुंबईकरांना लवकरच वीज बिलात मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) आर्थिक वर्ष २०२५-२६ ते २०२९-३० साठी बहु-वर्षीय दर (MYT) प्रस्तावाला मंजुरी दिली असून, वीज दरात कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२५ पासून नवे दर लागू होतील, ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना फायदा होईल. टाटा पॉवरनेही वीज दर कमी करण्याची घोषणा केली असून, मुंबईतील सुमारे ८ लाख ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. पुढील पाच वर्षांत वीज दरात तब्बल २८ टक्के कपात होणार आहे.
टाटा पॉवरच्या उपनगरीय ग्राहकांसाठी ०-१०० kWh आणि १००-३०० kWh या श्रेणीतील दर कमी होणार आहेत. सध्या सरासरी ९.१७ रुपये प्रति kWh असलेले दर २०२९-३० पर्यंत हळूहळू ६.६३ रुपये प्रति kWh वर येतील. याचा अर्थ पाच वर्षांत २८% दर कपात होईल. ही कपात टप्प्याटप्प्याने लागू होणार असून, ग्राहकांचं वीज बिल लक्षणीयरीत्या कमी होईल.
MERC च्या या निर्णयामुळे वीज दरात घट होणार असून, १ एप्रिलपासून नवे दर प्रत्यक्षात येतील. टाटा पॉवरच्या या पावलामुळे मुंबईतील लाखो कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल. पुढील पाच वर्षांत वीज दर २८ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठी बचत होणार आहे. हा निर्णय वीज ग्राहकांसाठी खूशखबर मानला जात आहे.