बंडखोर भुजबळांच्या जबरदस्त बाऊन्सर्सनी ‘महायुती’ घायाळ !

प्रचंड बहुमत घेऊन ‘महायुती’चे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले ! आता, सगळे काही सुरळीत होणार असे वाटत असतानाच मिठाचा खडा पडला, आणि मंत्रीपद न मिळालेल्या असंतुष्टांनी डोके वर काढले. भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आणि शिवसेनेचे विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे हे या असंतुष्टांमधील काही मोठे नेते ! सर्वांना या ना त्या प्रकारे गप्प करण्यात यश आले. पण, गप्प बसणार ते छगन भुजबळ कसले ? छगन भुजबळांनी आपला बंडखोरीचा पवित्रा कायम ठेवला आणि दररोज नवनवीन बाऊन्सर्स टाकून ‘महायुती’ च्या नेत्यांना घायाळ करून टाकले.
भुजबळ यांनी प्रथम आपल्या ओबीसी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यांना मार्गदर्शन करून आपल्या बंडखोरीचे खरे कारण सांगितले. पण, त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार त्यांना फारसे महत्त्व देत नाहीत, हे लक्षात येताच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर नाराजीचा पाढा वाचला. त्यांच्यामधील चर्चा ही गुलदस्त्यात झाली असली तरी त्यावर आठ दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे सध्या तरी भुजबळ शांत आहेत. कदाचित आगामी दोन-तीन दिवसात अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे छगन भुजबळ यांची समजूत काढतीलही.. पण, सध्या त्यांच्या आरोपांमुळे कलुषित झालेले वातावरण निवळणार कसे, हा खरा प्रश्न आहे ! प्रचंड बहुमत असताना सरकार स्थापन करण्यात दिरंगाई, त्यानंतर मंत्रिमंडळ शपथविधीला दिरंगाई आणि नंतर मंत्र्यांच्या खातेवाटपाला उशीर, याचे कारण पुढे येत नसले तरी त्यातील एक मुद्दा हा भुजबळांची नाराजी असणार, हे मात्र नक्की आहे.
भुजबळांची बंडखोरी नवी नाही
वास्तविक, भुजबळ ज्या ज्या पक्षांमध्ये होते, तेथील नेत्यांच्या विरोधात त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे, बंडखोरीची भाषा केली आहे. ते शिवसेनेत होते, त्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बोलणे किंवा पाऊल उचलणे हे फक्त अवघड नव्हते तर अशक्य होते.. त्या काळात भुजबळांनी शिवसेना सोडून बंद केले होते. त्यानंतर काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांच्याबरोबर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यांनी समता परिषद म्हणजे ओबीसींची संघटना स्थापन करून आपली ताकद वेळोवेळी दाखवून दिली आहे. अर्थात् त्याचे त्यांना फळही मिळाले आहे. भुजबळ उपमुख्यमंत्री झाले, गृहमंत्री झाले. पण, तेवढ्यावर ते कधीच समाधानी नव्हते.
मधल्या काळात अब्दुल करीम तेलगी याचा स्टॅम्प घोटाळा, दिल्लीतला महाराष्ट्र सदनाचा घोटाळा आणि अन्य काही घोटाळ्यांमध्ये भुजबळांचे नाव आले, त्यांनी तुरुंगवासही भोगला. पण, स्पष्ट बोलणे, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता बिनधास्त बोलणे ही त्यांची जुनीच सवय किंवा खोड ! त्यामुळे त्यांच्या घरात खासदारकी, आमदारकी कायम राहिली त्यांचा पुतण्या आणि मुलगा सुद्धा राजकारणात आला. थोडक्यात काय, राजकारणातील सर्व फायदे त्यांनी छानपैकी उपभोगले आहेत. म्हणून त्यांनी केलेली बंडखोरी म्हणजे एक नाटक तर नाही ना? आपले महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी आडमुठी भूमिका स्वीकारली नाही ना, अशी शंका येऊन जाते.
बंडखोर व्यक्तिमत्त्वाची वाटचाल
छगन भुजबळ यांची पार्श्वभूमी तपासून पाहताना आज आठवण येते ती डिसेंबर १९९१ ची ! नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू होते. तेव्हा अर्थातच काँग्रेस सत्तेवर होती. शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. अर्थात्च बाळासाहेब ठाकरे यांनी ही निवड केली असणार ! छगन भुजबळ यांना बंडखोरीसाठी काहीतरी कारण हवे असणार आणि नेमकी त्यांना हीच संधी मिळाली असावी. त्यांची मानसिकता व अस्वस्थता शरद पवार यांनी हेरली आणि त्यांना शिवसेनेत बंड करून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. शिवसेनेत सतत आक्रमक राहून, पक्ष वाढवून डावलले जाते ही खंत व्यक्त करत त्यांनी शड्डू ठोकला. दुसरीकडे शरद पवारांसारखा दिग्गज नेता आपल्या पाठीशी उभा. मग काय, त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विरोधातच बंडाचा झेंडा फडकवला, शिवसेना सोडली ! तेव्हा शिवसेनेचा जबरदस्त दबदबा होता. शिवसेनाप्रमुखांना आव्हान देणे सोपे नव्हते. शिवसैनिकांचा रोष काय असतो हे भुजबळांना चांगले ठाऊक होते. बारा आमदारांना आपल्या बंडात बरोबर घेण्याची त्यांची तयारी झाली. सभागृहातून भुजबळ हे त्यांच्या साथीदार आमदारांसह अचानक बेपत्ता झाले. या बंडाने शिवसेनाप्रमुखही जाम भडकले होते. शिवसेनेत बंड करून आणि शिवसेनाप्रमुखांना आव्हान देऊन मुंबईत राहणे हे सोपे नाही, हे सर्वांनाच ठाऊक होते. एकदा तरी बाळासाहेबांनी मला छगन म्हणून हाक मारावी असे स्वत: भुजबळ काकुळतीला येऊन सांगत होते, पण शिवसेनाप्रमुखांनी त्यांचा फोनही घेतला नाही आणि त्यांच्याशी शब्दही बोलले नाहीत.
त्यानंतर मात्र काँग्रेस आणि शरद पवारांचे आशीर्वाद याशिवाय त्यांच्यापुढे कोणताच पर्याय उरला नाही. पुढे शिवसेनाप्रमुखांनी त्यांना लखोबा लोखंडे म्हणून कायमचे संबोधले. पण, काँग्रेसने मंत्रीपदाची ताकद दिल्यावर भुजबळही शिवसेनाप्रमुखांना टी. बाळू असे उपहासात्मक बोलू लागले. ज्यांनी त्यांना दोन वेळा महापौर, आमदार केले त्यांच्याशीच भुजबळांनी पंगा घेतला होता. आज तब्बल ३३ वर्षांनंतर हेच भुजबळ “जहाँ नही चैना, वहाँ नही रहेना “असा सूर आळवत आहेत. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात आणि आज अजित पवारांच्या विरोधात ते तोफा डागत आहेत. तेव्हा विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही म्हणून आणि आता फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नाही म्हणून ते आक्रोश करीत आहेत. पूर्वी त्यांनी बंड केले, तेव्हा शरद पवारांची ताकद त्यांच्या पाठीशी होती, हे लक्षात घ्यायला हवे.. आणि आता ?
दादांची ताकद आणि भाजपाचे कवच
आता दीड वर्षांपूर्वीचा काळ पाहू या..जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वालाच त्यांनी आव्हान दिले, तेव्हा अजितदादांचे वलय आणि भाजपाचे संरक्षक कवच त्यांच्याबरोबर होते. पण आता काय? आता भुजबळांनी अजितदादांच्याच विरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे खरा..त्यांच्या पाठीशी नेमके कोण आहे, हे गूढ आहे. भुजबळांना मंत्री करावे, म्हणून स्वत: देवेंद्र फडणवीस आग्रही होते,असे ते वारंवार सांगत आहेत. तसेच हम एक है,तो सेफ हैं, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवडणुकीतील आवडती घोषणा देत आहेत. त्यांना भविष्यात कोणाकडून काय मिळेल, त्यांची कितपत कदर केली जाईल, हे माहीत नाही, पण अजितदादांसाठी ते मात्र डोकेदुखी होऊन बसले आहेत.
छगन भुजबळ यांनी पंच्याहत्तरी ओलांडली असून गेल्या पन्नास वर्षांच्या त्यांच्या राजकीय जीवनातील हे त्यांचे तिसरे बंड आहे. त्यांच्या मनाविरुद्ध ज्या ज्या वेळी काही तरी घडते किंवा त्यांना पाहिजे ते मिळत नाही, तेव्हा ते ओबीसींची म्हणजेच समता परिषदेची ढाल पुढे करतात, हा इतिहास सर्वांनाच माहीत झाला आहे. १९७३ मध्ये ते मुंबई महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक झाले, १९८५ मध्ये ते माझगावमधून आमदार म्हणून निवडून आले. माझगावमधून दोन वेळा आमदार झाले, दोन वेळा महापौर झाले. पण ते शिवसेनाप्रमुखांचे होऊ शकले नाहीत. मनोहर जोशींना विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपदी नेमल्याने त्यांचे बिनसले. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना संधी मिळाली. पण, त्यात भुजबळ यांचे नाव नाही, त्यानंतर भुजबळांचा संताप सुरू झाला.
आठवा जरा, शरद पवारांच्या पक्षात भुजबळांना खूप महत्त्व दिले गेले. प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्रीपद त्यांना मिळाले. ओबीसी नेता म्हणत ते नेहमीच वलंयाकित राहिले. पण मनी लॉँड्रिंगच्या आरोपावरून ईडीकडून झालेली चौकशी, दोन वर्षे जेल आठवते का ? भुजबळ हे भाजपाच्या रडारावर अनेक वर्षे होते. त्यांचा पुतण्या समीरने बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सुहास कांदे या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली तेव्हापासून शिवसेनाही भुजबळांवर नाराज आहे. त्यांचा संताप त्यांच्या समर्थकांमध्ये पोहोचल्यावर त्यांचा राग अजितदादांवर निघाला. काही ठिकाणी तर अजितदादांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन झाले. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून असे आंदोलन प्रथमच महाराष्ट्राला बघायला मिळाले असावे.
मला मंत्रीपदाची हाव नाही, रास्ता मेरा है, मी रस्त्यावर लढाई लढणार, असे ते म्हणत आहेत. कोणाच्या विरोधात व काय पाहिजे म्हणून ते लढणार आहेत? आपल्याला मंत्री करा असे प्रफुल पटेल, देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितले होते, मग का केले नाही, असा प्रश्न त्यांना पडला आहे. पण आता भुजबळ काय करणार? जाणार कुठे? ओबीसींचा एल्गार पुकारण्याची भाषा करतात, मराठा नेते मनोज जरांगेंना अंगावर घेतल्याचे बक्षीस मिळाल्याचे सांगतात. आपण कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, पुढे आणखी संकटे येतील, तुम्ही हिम्मत ठेवा असे ओबीसी समाजाला आवाहन करतात, त्यांच्या मनात काय ते समजतच नाही. पूर्वीचे एक ठीक होते. पण,आज भुजबळांच्या बरोबर कोण आहे ? या वयात लढण्याची त्यांची ऊर्मी असली तरी ते कोणाविरोधात लढणार ? सत्तेला लाथ मारून ते बाहेर जातील का ? ज्या भाजपाने त्यांच्यावर ढीगभर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तो पक्ष त्यांना जवळ घेईल का? समाजासाठी नव्हे, तर स्वत:ला मंत्रीपद मिळाले नाही,म्हणून ते टाहो फोडत आहेत, हे जनतेला कळत नाही, असा त्यांचा समज आहे का ?
शेवटी काय भुजबळ हे तर मैदानात उतरले आहेत, नेहमीप्रमाणे आपल्याच नेतृत्वाला ते आव्हान देत आहेत. पण, पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतर पूर्वीची ताकद आणि तो जोश त्यांच्यात राहील का ? पक्षातून बाहेर पडायचे म्हटल्यास जाणार कोठे ? राजकारणातल्या या सर्कशीतला एक झोपाळा सोडला तर समोर पकडण्यासारखा दुसरा झोपाळा आहे का.. त्यांच्यासमोर तो झोपाळा भाजपचा असला तरी त्यांना भाजपा जवळ घेईल का? हे सगळे प्रश्न आज उभे आहेत. यावर काय मार्ग निघेल माहित नाही, पण सध्या तरी भुजबळांच्या जबरदस्त बाऊन्सर्सनी ‘महायुती’ ला मात्र घायाळ केले आहे, हे सांगण्यासाठी कोणाची गरज नाही !