मालवण बांगडा फेक प्रकरण! मंत्री नितेश राणेंना दिलासा, 32 जणांची निर्दोष मुक्तता

Nitesh Rane : मालवणमध्ये अधिकाऱ्यावर बांगडा फेक प्रकरणी मंत्री नितेश राणे यांच्यासह 32 जणांना दिलासा मिळाला आहे. त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील मत्स्य अधिकारी प्रदीप वस्त यांच्यावर 6 जुलै 2017 रोजी नितेश राणेंनी बांगडा फेकला होता. त्या बांगडा फेक प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यामधून तत्कालीन आमदार तथा विद्यमान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्य विकास व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्यासह 32 जणांची जिल्हा व्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश श्रीमती व्ही एस देशमुख यांनी या प्रकरणाचा निकाल देताना नितेश राणेंची निर्दोष मुक्तता केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक मच्छीमारांच्या मागण्यांसाठी 6 जुलै 2017 रोजी तत्कालीन कॉंग्रेस आमदार नितेश राणे आक्रमक झाले होते. सहाय्यक मत्स्य व्यवसाय संचालक कार्यालयावर शेकडो मच्छीमारांसह धडक देत त्यांनी मत्स्य आयुक्तांना फैलावर घेतले होते. यावेळी संतप्त झालेल्या आमदार राणेंनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या अंगावर बांगडा फेकून मारला व जाब विचारला होता. तसेच मत्स्य हंगामात समुद्रात पर्ससीननेटचे ट्रॉलर्स दिसून आल्यास ते पेटवून दिले जातील, असा इशारा आमदार राणे यांनी यावेळी दिला होता. तसेच तुम्ही तुमची काम नीट करत नाही. जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत. पैसे खाता. त्यामुळेच आम्हाला इथवर यावं लागलं, असा संताप राणे यांनी व्यक्त केला होता.
सागरी हद्दीत अनधिकृतपणे सुरू असलेली पर्ससीन नेटची मासेमारी बंद करण्यासाठी राणे यांच्या नेतृत्वाखाली देवगड, मालवणातील शेकडो मच्छीमारांनी येथील सहायक मत्स्य व्यवसाय संचालक कार्यालयात धडक दिली होती. यावेळी मासेमारी बंदी असताना सुरू असलेली मासेमारी दाखवण्यासाठी चक्क बांगडा मासळीची टोपली मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या टेबलवर ओतून शासनाचा व मत्स्य विभागाचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. तसेच यावेळी मत्स्य आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त आमदार राणे यांनी टेबलावरील बांगडा आयुक्तांच्या अंगावर फेकला. सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांनी मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर अनधिकृत पर्ससीन मासेमारीवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन यावेळी आमदारांना दिले होते. या लेखी आश्वासनानुसार कार्यवाही न झाल्यास कायदा हातात घेतला जाईल तसेच संबंधित अधिकाऱ्यावरच कारवाई करून त्यांच्याकडूनच दंड वसूल करू असे स्पष्ट करत आमदार राणे यांनी हे आंदोलन थांबविले होते.
दरम्यान, या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मत्स्य आयुक्तांना बांगडा फेकून मारल्याच्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांना मालवणात पोलिसांनी अटकही केली होती. मत्स्य आयुक्तांविरोधातील मासेफेक आंदोलन प्रकरणी त्यांच्यासह अनेकांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती.