पिंपरी महापालिकेचे कामकाज शंभर टक्के झाले डिजिटल
१ एप्रिल २०२५ पासून कागदविरहित कारभार

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एप्रिल २०२५ पासून कागदविरहित कारभाराकडे यशस्वी वाटचाल सुरू केली असून देशातील आधुनिक व स्मार्ट महानगरपालिका होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. महानगरपालिकेत दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली , कार्यप्रवाह प्रणाली वापरली जात असून, १ एप्रिल २०२५ पासून ३१ हजारांहून जास्त कागदपत्र व ३ हजार ७१६ फाईल्सचे कामकाज डिजिटल पद्धतीने पूर्ण केले आहे.
महानगरपालिकेच्या सर्व ५४ विभागांमध्ये आता एकही फाईल्स फिजिकल पद्धतीने तयार केली जात नाही. फाईल्स तयार करण्यासाठी डीएमएस आणि वर्क फ्लो प्रणालीचा वापर केला जात आहे. डीएमएस प्रणालीचा वापर करून सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग, ट्रॅकिंग, सामायिकरण व शोध घेणे शक्य झाले आहे. तर, वर्क फ्लो प्रणालीमुळे प्रत्येक फाईलचे कामकाज वेळेत पूर्ण होत असून वेळेची बचत होत आहे.
हेही वाचा – मालवण बांगडा फेक प्रकरण! मंत्री नितेश राणेंना दिलासा, 32 जणांची निर्दोष मुक्तता
प्रशासनाचे कामकाज पूर्णतः डिजिटल झाल्यामुळे निर्णयप्रक्रिया, पारदर्शकता व जबाबदारीत लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रणालींच्या वापरामुळे स्मार्ट प्रशासन, पारदर्शक कामकाज या दिशेने महानगरपालिकेची यशस्वी वाटचाल सुरू असून महानगरपालिकेच्या सेवासुविधा नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवण्यास देखील मदत होऊ लागली आहे.
पालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन व ठेकेदारांचे बिले काढण्यासाठी आता सॅप प्रणालीचा वापर केला जात आहे. मार्च व एप्रिलमध्ये ६ हजार ५०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे वेतन व ठेकेदारांचे बिले सॅप प्रणालीद्वारे काढण्यात आली आहेत. याशिवाय, महानगरपालिकेतील अभियांत्रिकी विभागांनी सॅप प्रणालीवर १७६ अंदाजपत्रके तयार केली असून, ही जीआयएस डेटाबेसवर नोंदवली गेली आहेत. ज्यामुळे त्यांचे रिअल-टाइम ट्रॅकिंग शक्य झाले आहे. विवाह नोंदणी, क्रीडा मैदाने व सभागृह बुकिंग, झोपडपट्टी बिलिंग यांसारख्या नागरी सेवा देखील डिजिटल झाल्या आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोणत्याही विभागात आता फिजिकल पद्धतीने फाईल एका विभागातून दुसऱ्या विभागात पाठवण्याची गरज राहिली नाही. महानगरपालिकेचे संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरुपात करण्यात आले असून यामुळे प्रशासनातील कामकाजाची गती, पारदर्शकता वाढली आहे. केवळ डिजिटल स्वरुपातील हा बदल नसून तो कार्यक्षमतेचा व विश्वासार्हतेचा प्रतीक आहे. या यंत्रणेमध्ये वापरकर्त्यांच्या अभिप्रायावरून सुधारणा देखील केल्या जात आहेत.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका