Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलोकसंवाद - संपादकीय

To The Point : माजी नगरसेविका सीमा सावळे यांची भाजपाच्या जहाजात ‘सीट’ मिळण्यासाठी ‘फिल्डिंग’!

वेध महापालिका निवडणुकीचे : पक्षातून हकालपट्टीपासून सुरू झालेला प्रवास अखेर ‘हिंदूत्व’च्या मुद्यावर आला!

पिंपरी-चिंचवड । अविनाश आदक : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासात 2017 मध्ये पहिल्यांदा सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात ‘‘पहिली स्थायी समिती सभापती’’पदाचा मान मिळणाऱ्या दबंग नेत्या सीमा सावळे यांनी आता पुन्हा भाजपाच्या जहाजात ‘सीट’ मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षातून हकालपट्टीपासून सुरू झालेला सावळे यांचा प्रवास आता ‘हिंदुत्वा’च्या मुद्यापर्यंत आला आहे. विशेष म्हणजे, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानिमित्त भाजपाप्रणित ‘तिरंगा यात्रे’त सहभाग आणि विकास आराखड्यातील डीपीमध्ये श्रीक्षेत्र आळंदी येथील कत्तलखान्याच्या मुद्यावर घेतलेल्या भूमिकेमुळे सावळे यांची ‘लाईन ऑफ पॉलिटीक्स’ काय असेल? हे अधोरेखित झाले आहे.

‘‘पूर्वीची शिवसेना आणि शिवसेनेची सीमा..’’ असा लौकीक असलेल्या सीमा सावळे यांनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पानिपत करण्यात मोठे योगदान दिले. त्याची बक्षिसी म्हणून त्यांना 2017 मध्ये त्यांना भाजपाने स्थायी  समिती सभापती केले. पण, अत्यंत मोठी राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या सावळे यांनी 2019 मध्ये बंडखोरी करीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या उमेदवाराविरोधात अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2019 ते 2024 या काळात सावळे यांनी भाजपाविरोधात मोहीमच उघडली होती.

भाजपाचे स्थानिक नेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या एकेकाळी कट्टर असलेल्या सीमा सावळे यांचे कालांतराने जगताप- लांडगे यांच्यासोबत राजकीय मतभेद निर्माण झाले. किंबहुना, चिंचवडचे विद्यमान आमदार शंकर जगताप यांनीही सावळे यांच्याशी जुळवून घेतले नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा खुला प्रचार केला होता.

2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सीमा साळवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, अजित पवार यांनी त्यांना प्रशासकीय ताकद दिली. त्यांना महापालिकेतील बैठकांनाही सोबत बसवले. पिंपरी विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्याविरोधात सावळे यांनी ‘नॅरेटिव्ह’ तयार केला. ‘‘बनसोडे यांचे कामच नाही..ते उपलब्धच होत नाहीत…’’ अशी वातावरण निर्मिती केली. मात्र, अजित पवार यांनी शेवटी बनसोडे यांनाच तिकीट दिले. विशेष म्हणजे, भोसरी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना सर्व ताकद देवून विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात रान पेटवले होते. यापुढील काळात लांडगे किंवा जगताप त्यांची सलोखा करणार नाहीत, असे राजकीय जाणकार सांगतात.

सीमा सावळे यांना ‘पॉलिटीकल स्पेस’ नाही…

2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्ही बाजुंनी तिकीट न मिळाल्यामुळे संपूर्ण तयारी करुनही सीमा सावळे यांचा भ्रमनिरास झाला. किंबहुना, मतदार संघामध्ये दक्षिण भारतातील राजकारणाप्रमाणे ऐतिहासिक साडीवाटप करीत सावळे यांनी धुरळा उडवून दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभेत होईल, असा आशावाद होता. मात्र, चित्र पालटले. भाजपा- शिवसेना- राष्ट्रवादी महायुतीने राज्यात ‘‘क्लिन स्वीप’’ विजय मिळवला. भोसरीत महेश लांडगे यांनी ‘हॅट्रिक’ केली. महायुतीविरोधात काम केले आणि शहरात महाविकास आघाडीला संधी नाही, त्यामुळे बदलत्या राजकारणात आपल्याला ‘पॉलिटीकल स्पेस’ नाही.. ही बाब लक्षात आल्यानंतर सीमा सावळे यांना त्यामुळेच त्यांना भाजपाशी जुळवून घ्यावे लागत आहे. पण, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप आणि भाजपा पक्षश्रेष्ठी सीमा सावळे यांना इंद्रायणीनगर- बालाजीनगर- गवळीमाथा या प्रभागातून पक्षाचे तिकीट मिळवण्याचे आव्हान आहे. कारण, भाजपा- राष्ट्रवादी महायुती एकत्रित लढले किंवा स्वतंत्र लढले तरी या प्रभागामध्ये ‘कमळ’ आणि ‘घड्याळ’ चिन्हावर लढण्यासाठी दोन्ही पक्षांकडे तुल्यबळ उमेदवार आहेत.

धार्मिक मुद्दाला हात घातला…

दरम्यान, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांच्या कालावधीत घ्या..’’ असे आदेश दिले. सर्वपक्षीयांकडून निवडणुकीची जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय दिशाहीन झालेल्या सीमा सावळे यांनी भाजपाच्या जहाजामध्ये ‘‘सीट’’ मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नुकतेच भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची नियुक्ती झाली. त्यानंतर लगेचच सीमा सावळे आणि आशा शेंडगे यांनी त्यांची अभिष्टचिंतन भेट घेतली. यावेळी त्यांचे राजकीय सल्लागार सारंग कामतेकर हेसुद्धा उपस्थित होते. भाजपाच्या कारभारावर सडकून टीका करणाऱ्या सावळे यांनी ‘‘ऑपरेशन सिंदूर’’ च्या विजयानंतर काढलेल्या तिरंगा यात्रेही सक्रीय सहभाग घेतला. विशेष म्हणजे, महापालिका सुधारित विकास आराखड्यातील श्रीक्षेत्र आळंदीच्या परिसरात प्रस्तावित कत्तलखान्याविरोधात सीमा सावळे यांनी प्रशासनावर प्रहार केला. ‘‘आमच्या धार्मिक भावना दुखवणाऱ्या विकास आराखड्याची आवश्यकता नाही… प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का?’’ असा सडेतोड सवाल सावळे यांनी उपस्थित केला. त्यामुळे भाजपाचा केंद्रबिंदू असलेला ‘‘देव-देश अन्‌ धर्म..’’ या मुद्यावर आपण काम करीत आहोत, अशी ‘इमेज बिल्डिंग’ सीमा सावळे करीत आहेत, हे स्पष्ट होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button