मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather | राज्यात मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः २ आणि ३ जुलै रोजी मुंबईत ९० ते १२० मिमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण भारतात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशाच्या सीमेकडे सरकत आहे. या हवामान प्रणालीमुळे कोकण किनारपट्टीवर परिणाम होत असून, वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या उत्तर उपनगरांमधील बोरिवली, कांदिवली, दहिसर आणि मालाड या भागांत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर दक्षिण मुंबईत पावसाचा जोर तुलनेने कमी राहील.
हेही वाचा : कामगारांकडून पर्यावरणाचा जागर!
दरम्यान, पालघर जिल्हा आणि पश्चिम घाटमाथा भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पावसाचा अंदाज कुठे
मुसळधार पाऊस : मुंबई, ठाणे, पालघर
अतिमुसळधार पाऊस : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट परिसर, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट, सातारा घाट परिसर
वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज : छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर
हलक्या सरींचा अंदाज : पुणे, अहिल्या नगर, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली , नांदेड , लातूर, धाराशिव.