Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

आशिया चषक हॉकी: भारतीय कुमार संघाने रचला इतिहास; जपानचा ४-१ ने धुव्वा उडवत तिसऱ्यांदा जिंकले जेतेपद

Asia Cup Hockey 2026 | भारतीय कुमार संघाने (१८ वर्षांखालील) आपला दबदबा कायम राखत आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या जेतेपदावर दिमाखात नाव कोरले आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय मुलांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत यजमान जपानचा ४-१ असा धुव्वा उडवला. भारताने हे विजेतेपद पटकावण्याची ही तिसरी वेळ आहे. दुसरीकडे, भारतीय मुलींच्या संघानेही चमकदार कामगिरी करत दक्षिण कोरियाचा ३-० असा पराभव करून कांस्यपदक (Bronze Medal) पटकावले.

भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार पुन्हा एकदा आक्रमक खेळाडू आशीष पुर्ती ठरला. त्याने अंतिम सामन्यात जपानविरुद्ध सामन्याच्या दुसऱ्या, २८व्या आणि ३४व्या मिनिटाला गोल डागत शानदार हॅटट्रिक नोंदवली. संपूर्ण स्पर्धेत आशीषने सर्वाधिक १३ गोल करण्याचा विक्रम केला, ज्यामध्ये १२ गोल पेनल्टी कॉर्नरवर तर एक गोल पेनल्टी स्ट्रोकवर केला आहे. अंतिम लढतीत भारतासाठी चौथा गोल कर्णधार केतन कुशवाहने ३०व्या मिनिटाला केला. जपानकडून एकमेव गोल ५२व्या मिनिटाला नुमाडा गाकू याने केला.

सुरुवातीपासूनच टीम इंडियाचे वर्चस्व

अंतिम सामन्यात भारतीय संघाने पहिल्या मिनिटापासूनच यजमान जपानवर दडपण आणले. सामन्याच्या पहिल्या ९० सेकंदांतच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि आशीषने त्याचे गोलात रूपांतर करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रातही भारताचे वर्चस्व राहिले. २८व्या मिनिटाला दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर आशीषने दुसरा गोल केला. यानंतर लगेचच ३०व्या मिनिटाला प्रल्हाद राजभारच्या पासवर कर्णधार केतन कुशवाहने गोल करत मध्यंतरापर्यंत भारताला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.

हेही वाचा

महागाईचा भडका! घरगुती सिलिंडर २९ रुपयांनी महागला; पाहा तुमच्या शहरातील नवे दर

तिसऱ्या सत्रात वरिंदर सिंगच्या एका सुरेख चालीमुळे भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. या संधीचा फायदा उठवत आशीषने हॅटट्रिक पूर्ण केली आणि भारताची आघाडी ४-० अशी मजबूत केली. सामन्याच्या ५२व्या मिनिटाला जपानला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, ज्यावर नुमाडा गाकूने गोल करून जपानचे खाते उघडले. अखेरच्या सत्रात जपानने वेगवान खेळ करत लागोपाठ तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले, परंतु भारतीय बचाव फळीने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.

‘हॉकी इंडिया’कडून बक्षिसांचा वर्षाव

विजेता कुमार संघ (मुले)

भारतीय मुलांच्या संघातील ऐतिहासिक कामगिरीबद्दल हॉकी इंडियाने प्रत्येक खेळाडूला ३ लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे. तसेच संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपये दिले जाणार आहेत.

कांस्यपदक विजेता संघ (मुली)

दक्षिण कोरियाला पराभूत करून कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतीय मुलींच्या संघावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. या संघातील प्रत्येक महिला खेळाडूला १ लाख रुपये आणि संघासोबत असलेल्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५0 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button