Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

NEET पेपरफुटीनंतर NTA चा मोठा निर्णय; प्रश्नपत्रिकांसाठी ‘झिरो-ट्रस्ट’ मॉडेल

NTA NEET UG 2026 | NEET-UG २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणाने परीक्षा प्रक्रियेतील अत्यंत गोपनीय टप्प्यातील त्रुटी चव्हाट्यावर आणल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या पद्धतीतच अमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत आहे. या नवीन बदलाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया विशिष्ट परीक्षेपासून पूर्णपणे वेगळी करणे आणि ‘झिरो-ट्रस्ट आर्किटेक्चर’ (Zero-trust architecture) कडे वाटचाल करणे हा आहे. या प्रणालीमध्ये व्यक्तींपेक्षा प्रक्रियेवर अधिक विश्वास ठेवला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पुढील वर्षाच्या परीक्षेसाठी सरकारच्या पातळीवर सध्या एका प्रस्तावावर गंभीर चर्चा सुरू आहे. या नव्या प्रस्तावानुसार, प्रश्न तयार करण्यासाठी आमंत्रित केलेल्या विषय तज्ज्ञांना त्यांचे प्रश्न NEET, JEE की NTA द्वारे घेतल्या जाणाऱ्या इतर कोणत्या परीक्षेसाठी वापरले जाणार आहेत, हे माहित नसेल.

तज्ज्ञांनी तयार केलेले प्रश्न एका मोठ्या केंद्रीय संग्रहात (Question Bank) समाविष्ट केले जातील. एजन्सी विविध विषयांच्या सुमारे १०,००० प्रश्नांचा असा संग्रह तयार करण्याचा विचार करत आहे. त्यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने विषयांचा समतोल आणि काठिण्य पातळी ठरवून या संग्रहातून अंतिम प्रश्नपत्रिका तयार केली जाईल. यामुळे अंतिम प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष छापण्यापूर्वी ती कमीत कमी लोकांच्या नजरेखालून जाईल आणि कमालीची गोपनीयता राखली जाईल.

अनुवादकांसह १३ जणांना अटक; जुनी व्यवस्था चौकशीच्या फेऱ्यात

NEET-UG २०२६ च्या पेपर लीक प्रकरणी सीबीआयने केलेल्या तपासात आतापर्यंत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विभागाशी संबंधित असलेल्या अनुवादक (Translators) आणि विषय तज्ज्ञांसह १३ जणांना अटक केली आहे. अत्यंत गोपनीय अशा ‘प्रश्नपत्रिका निर्मिती आणि भाषांतर’ (CONOPs) या पहिल्याच टप्प्यात हा पेपर लीक झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा

“महागाई नियंत्रण म्हणजे टप्प्याटप्प्याने धक्के देणं नव्हे”; सिलिंडर दरवाढीवरून शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

या अटकेमुळे ‘विश्वासू तज्ज्ञांकडे प्रश्नपत्रिका सुरक्षित राहू शकते’ या यंत्रणेच्या जुन्या गृहितकाची पुन्हा तपासणी करणे अधिकाऱ्यांना भाग पडले आहे. जर पेपर लीक होत असेल, तर ही केवळ पेन आणि पेपरची समस्या नाही, तर संपूर्ण सिस्टीमच्या डिझाईन आणि संरचनेची समस्या आहे, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

भाषांतरासाठी आता ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) वापरणार

NTA ने सर्वोच्च न्यायालयात आधीच दिलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे भाषांतर प्रक्रियेत मोठे बदल केले जात आहेत. त्यानुसार भाषांतर प्रक्रियेच्या सुमारे ८५ टक्के भागासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरली जाईल आणि उर्वरित १५ टक्के भागाचे पुनरावलोकन आणि पडताळणी मानवी तज्ज्ञांकडून केली जाईल. मानवी अनुवादकांना पूर्णपणे काढून टाकणे हा यामागचा हेतू नसून, त्यांनी संवेदनशील साहित्यासोबत घालवलेला वेळ कमी करणे हा आहे.

AI ने भाषांतर केल्यानंतर मानवी अनुवादकाची भूमिका केवळ अर्थ योग्य आहे की नाही, हे तपासण्यापुरती मर्यादित असेल. त्यांना संपूर्ण प्रश्नपत्रिका न देता केवळ सुटे प्रश्न पडताळणीसाठी दिले जातील. त्यामुळे अनुवादकांनाही कोणत्या परीक्षेसाठी हे साहित्य तयार केले जात आहे, याची माहिती नसेल.

व्यक्तीपेक्षा प्रक्रियेवर विश्वास आवश्यक

NTA सध्या २१ जून रोजी होणाऱ्या NEET-UG च्या फेरपरीक्षेची तयारी करत असून काही बदल आधीच लागू करण्यात आले आहेत. यामध्ये विषय तज्ज्ञांचा पूर्णपणे नवीन संच वापरला जात आहे. तसेच प्रश्नपत्रिका छापून तयार झाल्यानंतर तिची वाहतूक आणि साठवणूक अधिक सुरक्षित करण्याबाबतही चर्चा सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या काही व्यक्ती अनेक वर्षांपासून या यंत्रणेशी जोडलेल्या होत्या. म्हणूनच यंत्रणेने व्यक्तींवर कमी आणि प्रक्रियेवर जास्त विश्वास ठेवला पाहिजे. जर अंगरक्षकच स्वतः धोका बनले, तर तुमचे रक्षण कोण करणार, असा सवाल एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शेवटी उपस्थित केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button