Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी “शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली”; संजय राऊत यांचा घणाघात

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एसआयटी चौकशीची मागणी; खाण उत्खनन, भू-संपादन घोटाळ्याचा आरोप

मुंबई | मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके हे सध्या गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात अडकले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुनील शेळके यांच्यावर शासनाची हजारो कोटी रुपयांची रॉयल्टी बुडवल्याचा थेट आरोप केला आहे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणीही त्यांनी केली आहे.

राऊत यांनी या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. “देवेंद्रजी, महाराष्ट्रातली लुटमार थांबवा,” असा रोखठोक उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.

कोणते आहेत आरोप?

संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, शासनाची परवानगी न घेता सुनील शेळके यांनी दगड आणि खाणींचे उत्खनन केलं. उत्खननातून मिळणारी रॉयल्टी शासनाकडे न भरता हजारो कोटींचा आर्थिक तोटा केला. आंबळे गावातील खाणजमिनींवर शेळके यांनी उत्खनन केले असून त्या जमिनीत सुमारे 100 फूट खोल खड्डे पडले आहेत. एमआयडीसीने ही खाणजमीन औद्योगिक क्षेत्रासाठी संपादीत केली, जरी ती जमीन उद्योगासाठी अयोग्य होती. त्या बदल्यात शेळकेंना 29 हेक्टर जमीन पर्यायी क्षेत्र म्हणून देण्यात आली, जे इतर शेतकऱ्यांना मिळाले नाही. प्रति एकर 73 लाखांची खाण जमीन घेऊन, 2.5 कोटी प्रति एकर किंमतीची जमीन देण्याचा प्रस्ताव एमआयडीसीने दिला. ग्रामस्थांच्या मुख्य रस्त्यांवर उत्खनन करून ते फोडले गेले, त्यामुळे स्थानिक लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा     :      मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

“सत्ताधाऱ्यांचेच आमदार करतायत लूट”

राऊत यांनी यावेळी सत्तेला पाठिंबा देणाऱ्या पक्षांचे आमदार व खासदारच महाराष्ट्राची लूट करत आहेत, असा घणाघात केला. याआधी त्यांनी संजय शिरसाट आणि भुमरे यांच्या संदर्भातही गंभीर आरोप केले होते. “शेळकेंसारखे आमदार गब्बर झालेत,” असा उपरोधिक टोला राऊत यांनी लगावला आहे.

एसआयटी चौकशीची जोरदार मागणी

या संपूर्ण प्रकरणात भू-संपादनात अपारदर्शकता, पर्यायी जमिनींचा अन्यायकारक वाटप, शासनाच्या आर्थिक फायद्याचा बळी आणि स्थानिक ग्रामस्थांचे हाल या सगळ्यांचा समावेश असून, एसआयटीमार्फत चौकशी न झाल्यास हे प्रकरण दडपले जाईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. या प्रकरणावर सुनील शेळके किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र संजय राऊत यांच्या या आरोपांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काळात या प्रकरणाची चौकशी होते की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button