अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

कर्तेपणा टाकणे हाच परमार्थ !

दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध; पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले, तो मुक्त समजावा. ‘ देही मी नव्हे ’ हे ज्याला समजले तो मुक्तच. सत्यज्ञान करून घेणे म्हणजेच मुक्तावस्था आहे. बद्धदशा आमची आम्ही निर्माण केली. काळजी, तळमळ आणि दु:ख ही बद्धपणाची लक्षणे होत, तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे. जागे होणे म्हणजे मुक्तदशेला येणे आहे. माझे माझ्याजवळच आहे, पण ते ठाऊक नाहीसे झाले आहे. भगवंताला विसरल्याने ‘ मी देही ’ असे म्हणू लागलो. देह तर माझ्या ताब्यात नाही, तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले. आपण कर्तेपण आपल्याकडे घेतो, आणि त्याबरोबर सुखदु:खही आपल्याकडे येते. मला सुख नाही आणि दु:खही नाही असे ज्याला वाटेल, तो मुक्‍त समजावा.

कर्तेपण घातुक असते. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला, असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो ! म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही, याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो. म्हणून, भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे, आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावे. भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते, तो विषय समजावा. विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच, आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचेच नाव परमार्थ.

हेही वाचा – बंगाली जनतेने सिंदूरची ताकद दाखवून द्यावी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय; पण फळाची अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते. आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ. हे करीत असताना भगवंताला दृष्टिआड न होऊ देणे, याचेच नाव अनुसंधान होय. समजा, आपण एखादे चांगले पुस्तक वाचीत बसलो आहोत, इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली; त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते ! ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते, त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे. प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे. अनुसंधानाचा अभ्यास करावा. भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा.

बोधवचन:- आपले कर्तव्याला न विसरावे। भगवंताचे अनुसंधान राखावे॥

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button