शेख हसीना यांच्या फाशीसाठी बांगला देशमध्ये दोरखंड तयार!
उठावाविरोधात केलेली कारवाई मानवतेविरुद्ध असल्याचा आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरणाचा ठपका !

ढाका / नवी दिल्ली : बांगला देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. गेल्या जुलै महिन्यात त्यांच्या विरोधात झालेल्या उठावाविरोधात त्यांनी केलेली कारवाई ही मानवतेविरुद्ध होती, असा ठपका आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरणाने दिला असून त्यांना दोषी ठरविले आहे. त्यामुळे आता त्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली जाण्याची शक्यता आहे. बांगला देशातील राजकीय तज्ज्ञांच्या मते शेख हसीना यांच्या फाशीसाठी सध्याच्या सरकारने दोरखंडसुद्धा तयार करून ठेवला आहे.
असा आवळला जातोय फास..
बांगला देशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांच्या सरकारविरोधात उद्रेक झाला होता. त्यावेळी त्यांनी आदेश देऊन केलेली कारवाई ही मानवतेविरुद्ध असल्याचा ठपका आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात अभियोक्ता पक्षाने ठेवला आहे. त्यात त्यांना दोषी ठरवण्यात आले असून
शेख हसीनाला मृत्यदंड होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.
शेख हसीना प्रचंड संकटात..
बांगला देशच्या शेख हसीना यांच्या अडचणी या निर्णयामुळे खूपच वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात अभियोक्ता पक्षाने शेख हसीना सत्तेवर असताना गेल्या जुलै महिन्यात त्यांच्या सरकार विरुद्ध जे बंड झाले होते, त्या उठवादरम्यान केलेली कारवाई ही मानवतेविरुद्ध गुन्हा असल्याचा ठपका ठेवला आहे.
हेही वाचा – बंगाली जनतेने सिंदूरची ताकद दाखवून द्यावी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
दोषारोप पत्रात स्पष्ट उल्लेख..
या अभियोक्त्याने रविवारी याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात हे आरोप सिद्ध झाले, तर शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते, असे तेथील मीडिया आणि वृत्तपत्रांचे मथळे असले तरी त्यांना फाशी द्यायची आहे हे आधीच ठरले आहे. आता फक्त कागदपत्रे रंगविणे एवढेच बाकी आहे, असे तेथील ज्येष्ठ आणि सत्ताधारी राजकारणी उघडपणे सांगत आहेत.
तत्कालीन गृहमंत्रीसुद्धा जबाबदार..
या दोषारोपपत्रात शेख हसीना यांच्यासह माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल आणि माजी आय. जी. पी. चौधरी मामून हे सहआरोपी आहेत. या खटल्याचे बांगला देशातील सर्व टीव्ही चॅनल्सवर थेट प्रसारण करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात पारदर्शकता कायम असेल, असे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे.
दि. १२ मे रोजी सादर केला अहवाल..
शेख हसीना यांच्यावर लावलेल्या आरोपात गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देशभरात पसरलेला हिंसाचार आणि त्यानंतर पोलिसांनी केलेला गोळीबार, सामूहिक हत्याकांड करण्यासाठी हसीना यांच्या सरकारने प्रोत्साहन दिल्याचे म्हटले आहे. यापूर्वी दि. १२ मे रोजी तपास अधिकाऱ्यांनी एक अहवाल सादर केला होता. त्यामध्ये शेख हसीना यांचा या हत्याकांडामागे हात असल्याचे म्हटले होते. त्यांनीच याविषयीचे आदेश दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, आणि तो सिद्ध होईल अशा तऱ्हेने कागदपत्रे देखील रंगवल्याचे सांगण्यात येते.
न्यायाधीकरणाचे गौडबंगाल !
महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या न्यायाधीकरणात हा खटला सुरू आहे. ते पाकिस्तानातून स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांवर खटला चालवण्यासाठी सुरू करण्यात आले होते. या न्यायाधीकरणात यापूर्वी जमात आणि ‘बांगला देश नॅशनल पार्टी’ च्या नेत्यांविरोधात खटले चालवण्यात आले आहेत. त्यातील अनेकांना मृत्यूदंड पण ठोठावण्यात आला आहे.
शेख हसीना भारताच्या आश्रयाला..
तख्तापालटानंतर शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. देशात एका खास गटाने सत्ता उलथवण्यासाठी हिंसाचार घडवून आणला होता. त्यानंतर हसीना यांनी भारतात पलायन केले. बांगलादेशातील सध्याचे युनूस सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवण्याची मागणी करत आहे. पण, भारताने त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारत आणि शेख हसीना यांचे संबंध पक्के होते. युनूस सरकार हे पाकिस्तानच्या हातातील कठपुतली आहे. ते चीनधार्जीणे आहे. ज्या भारताने बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. तेथील मुल्ला-मौलवी आता भारताविरोधी भाषा करत आहेत.
चीनचे मार्गदर्शन पाकचे आदेश..
सध्याच्या युनूस सरकारला चीनकडून रोज मार्गदर्शन होत असते. ते बराच काळ चीनच्या संपर्कात असतात तसेच चीनच्या वरिष्ठ नेत्यांनाही भेटून येतात. याशिवाय पाकिस्तान लष्कराचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि दहशतवाद्यांचे म्होरके देखील युनूस यांना सल्ला देण्यासाठी अधून मधून बांगला देशच्या दौऱ्यावर असतात हे देखील आता उघड झाले आहे.
संपूर्ण वातावरणच भारतविरोधी !
सध्या बांगलादेशात सत्तेवर असलेले युनूस सरकार हे दररोज भारताविरोधात गरळ ओकत आहे. सरकारची भूमिका ही पूर्वग्रहदूषित असून शेख हसीना भारताच्या आश्रयाला असल्यामुळे भारताविरोधातील आरोपांना मोठी धार चढली आहे. पाकिस्तानपासून बांगला देशला दूर करण्यात भारताचा मोठा वाटा आहे, त्यामुळे आधीच त्यांचा भारतावर राग आहे, तेथील सर्व न्यूज चॅनेल्स वर भारताच्या विरोधात वातावरण कसे होईल, याची सर्वजण खबरदारी घेत आहेत.