पाक नव्हे, अमेरिका पण नाही, चीनच भारताचा ‘शत्रू नंबर १’ !

‘ऑपरेशन सिंदूर’ भारताने यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर आणि पाकिस्तानची धूळधाण उडाल्यानंतर संपूर्ण जगात बोलबाला झाला, तो भारताच्या विजयाचा! मग सुरू झाले, एकमेकांना अडवण्याचे तंत्र ! पाककडून भारताची अडवणूक, अमेरिकेकडून धमक्या तर चीनकडून गुप्त हालचाली..
भारताने तर नाकच दाबले..
या सर्वावर उपाय म्हणून भारताने तर सिंधू नदीचे पाणी अडवून पाकचे नाकच दाबले आहे. तरीसुद्धा चीन उघडपणे पाकिस्तानच्या पाठीशी ठाम उभा आहे, तर भारताला अडचणीत आणण्याची धोरणे अमेरिकेकडून आखली जात आहेत. त्यामुळे भारताचा नेमका शत्रू कोण, याचा विचार आता जागतिक तज्ज्ञ करू लागले आहेत. पण एकूण कानोसा घेतला, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विचारवंतांशी सल्लामसलत केली, तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते की भारताचा मोठा शत्रू हा पाकिस्तान नाही किंवा अमेरिकन नाही.. तर क्रमांक एकचा शत्रू हा चीनचा आहे !
अमेरिकेचा संरक्षणविषयक अहवाल..
अमेरिकेच्या ‘डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी’ ने त्यांच्या सरकारला नुकताच एक अहवाल सादर केला आहे. जगात कोठे काय सुरु आहे, त्याचा अमेरिकेवर काय परिणाम होणार, याचे विश्लेषण वारंवार केले जाते, आणि तो अहवाल अमेरिकेच्या सरकार पुढे मांडला जातो. यावेळी, त्यात भारत-पाकिस्तानचे ताणलेले संबंध, भारताने पाकिस्तानच्या विरोधात केलेली लष्करी कारवाई, चीनकडून पाकिस्तानवर होणारी लष्करी आणि आर्थिक मदतीची खैरात, चीनच्या भारताविरुद्ध सुरू असलेल्या कुरापती अशा गोष्टींचा स्पष्ट उल्लेख केला आहे. भारत चीनला आणि चीन भारताला मुख्य प्रतिस्पर्धी मानतो, हे सुद्धा त्या अहवालात म्हटले आहे !
पाकिस्तान ही दुय्यम समस्या..
भारताच्या दृष्टीने चीनच प्रमुख शत्रू आहे, किंबहुना शत्रू क्रमांक एक तोच आहे. चीनच्या तुलनेत पाकिस्तान दुय्यम समस्या आहे, असे भारत मानतो, अशा प्रकारचे निरीक्षण अमेरिकेतील ‘डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी’ च्या ताज्या अहवालात नोंदवले गेले आहे. या अहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीचा उल्लेखही करण्यात आला आहे. जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यावर आणि भारताची लष्करी ताकद वाढवण्यावर पंतप्रधान मोदींचा भर राहील, असे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे. जगभरात कोणत्या देशात काय सुरु आहे? कुठे तणाव आहे? कुणाला कोणापासून धोका आहे? कोणते देश जवळ येत आहेत? अशा गोष्टींचा उल्लेख अमेरिकेच्या या अहवालात केला जातो.
हेही वाचा – बंगाली जनतेने सिंदूरची ताकद दाखवून द्यावी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
अहवालात नेमके काय म्हटले आहे ?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संरक्षणविषयक तीन प्रमुख गोष्टींना प्राधान्य राहील, अशी नोंद स्पष्टपणे या अहवालात करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर नेतृत्व करणे, चीनच्या कुरापतींवर मात करणे आणि भारताची लष्करी ताकद वाढवण्यावर मोदी सरकारचा भर असेल, असा त्यात उल्लेख असून नरेंद्र मोदी म्हणजेच पर्यायाने भारताची ताकद किती वाढली आहे, यावर देखील एक दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे.
भारत चीनलाच आपला प्रमुख शत्रू मानतो. पाकिस्तानही भारतासाठी काहीशी दुय्यम समस्या आहे, अशी भारताची भूमिका असल्याचे म्हटले आहे. चीनचा धोका कमी करण्यासाठी भारत विविध देशांसोबत हिंदी महासागरात सराव, प्रशिक्षण, शस्त्रास्त्र विक्री आणि माहिती पुरवून आणि मदत करीत मैत्री वाढवत आहे.
भारताचा वाढता सहभाग..
इंडो-पॅसिफिक भागात भारत द्विपक्षीय, त्रिपक्षीय सहभाग वाढवत आहे. ब्रिक्स, शांघाय को-ऑपरेशन ऑरगनायजेशन आणि आसियान यासारख्या बहुपक्षीय मंचांवर भारत सक्रिय सहभाग वाढवत आहे, हे संपूर्ण जगाच्या लक्षात आले असून ही कूटनीतीच भारताला यशाच्या मार्गावर घेऊन जात आहे असे अहवाल सांगतो.
‘मेड इन इंडिया’, आणि आत्मनिर्भरता!
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यावर, ‘मेड इन इंडिया’ वर भारताचा भर कायम असेल, असे अहवालात सांगण्यात आले असून भारत आणि रशियाच्या मैत्रीबाबत महत्त्वाचे उल्लेख आहेत, ते म्हणजे, २०२५ मध्ये देखील भारत रशियासोबत चांगले संबंध राखेल. आर्थिक आणि लष्करी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रशिया भारताचा महत्त्वाचा मित्र आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून भारताने रशियाकडून लष्करी सामग्री घेणे कमी केले आहे. चीन-पाकिस्तानसोबतच्या युद्धात भारत रशियन बनवाटीचे रणगाडे, लढाऊ विमानांवरच अवंलबून आहे, असेही त्यात म्हटले आहे. त्यांच्या देखरेखीसाठी सुटे भाग मिळवण्यासाठी रशियासोबत चांगले संबंध असणे भारतासाठी महत्त्वाचे आहे.
चीनची पाकवर लष्करी खैरात..
रशिया-चीनमध्ये वाढती जवळीक जास्त घट्ट होऊ नये, यासाठी भारत रशियासोबत चांगले संबंध राखेल. चीनच्या आर्थिक आणि लष्करी खैरातीवर पाकिस्तान तगून राहील आणि चीनच्या जोरावर आपला भारताविरोध कायम राखेल असेही अहवालात म्हटले आहे. प्रत्येक खंडातील, प्रत्येक देशाची संरक्षण सज्जता कशी आहे ? शेजारी देशांशी संबंध कसे आहेत? त्याचा अमेरिकेवर काय परिणाम होईल, याचा बारकाईने अभ्यास केलेला या अहवालातून दिसून येते.
भारताच्या हालचालींवर लक्ष..
सर्वच देशांचे भारताच्या हालचालींवर अगदी बारकाईने लक्ष आहे. आता, भारत ही चौथी मोठी अर्थव्यवस्था बनली असल्याने भारताची आंतरराष्ट्रीय धोरणे, परराष्ट्रीय धोरणे, आयात निर्यात याचा सगळेच जण विचार करत आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या गाठीभेटी आणि भारताचे इतर देशांशी होणारे करार, यांचा अभ्यास संपूर्ण जगातील तज्ज्ञ करीत आहेत, हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.
भारताची नियत, दूरदृष्टी, पाया भक्कम..
या सर्व पार्श्वभूमीवर भारताने जी विकासाची वाटचाल चालवली आहे, त्यामागील भारताची नियत, सतत विकासाचे धोरण दूरदृष्टी आणि मूलभूत गरजांमधील पाया भक्कम असल्यामुळेच कोणत्याही देशाच्या कुरघोड्यांचा भारतावर अजिबात परिणाम होणार नाही. फक्त केंद्र सरकारच्या धोरणांना येथील स्थानिक विरोधक कशी साथ देतात, याची काळजी मोदी सरकारला करावी लागणार आहे.. ते झाले तर अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणे भारताला या पंचवार्षिक योजनेत सहज शक्य होणार आहे.