बंगाली जनतेने सिंदूरची ताकद दाखवून द्यावी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

कोलकता : पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मौन बाळगून आहेत. जेव्हा भारतीय सैन्याने त्या हल्ल्याचा बदला घेतला तेव्हा ममता आणि त्यांच्या नेत्यांनी बनावट टिप्पण्या करून ‘ऑपरेशन सिंदूर’चा अपमान केला. बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जींना सिंदूरची ताकद दाखवून द्यावी. आपल्याला पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन करावे लागेल, घुसखोरी थांबवावी लागेल, भ्रष्टाचार थांबवावा लागेल, हिंदूंचे स्थलांतर थांबवावे लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियमवर पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत अमित शहा बोलत होते.
यावेळी वर्ष २०२६ मध्य येत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. अमित शाह म्हणाले,वर्षानुवर्षे बंगालवर कम्युनिस्टांचे राज्य होते. त्यानंतर ममता बॅनर्जी ‘माँ, माती, मानुष’चा नारा घेऊन आल्या. त्यांनी बंगालच्या महान भूमीला घुसखोरी, महिलांवरील अत्याचार, गुन्हेगारी, बॉम्बस्फोट आणि हिंदूंसोबत अनैतिकतेचा देश बनवले. ममता मुख्यमंत्री झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये शेकडो भाजप कार्यकर्ते मारले गेले.
हेही वाचा – “काही गोष्टी बोलून का दाखवता?”, वादग्रस्त वक्तव्यानंतर कोकाटेंना अजित पवारांचा सल्ला
दीदी, माझे ऐका, आता तुमची वेळ संपली आहे. आता २०२६ मध्ये भाजप सरकार स्थापन करेल. भाजप कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना शहा म्हणाले, मी आश्वासन देतो की तृणमूल काँग्रेस सत्तेबाहेर पडताच, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा होईल. ते जमिनीखाली लपले असले तरीही कायदा त्यांना सोडणार नाही.