
नांदगाव : शाळा प्रवेशोत्सवाचा सोहळा उत्साहात पार पाडणाऱ्या नांदगाव तालुक्यात शिक्षण विभागाची आता कागदावरच्या लक्ष्यांक पूर्तीसाठी मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी त्रेधातिरपीट उडत आहे. एकीकडे अशी धावपळ सुरूच आहे. रिक्त पदांसाठीचा अनुशेष भरून निघण्याऐवजी गेल्या १२ वर्षांपासून शिक्षण विभागाचा कार्यभार तात्पुरता पदभार सोपवून तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाची वाटचाल सुरू आहे.
मागील २०१३ ते २०२५ अशा बारा वर्षाच्या कालावधीत संवर्गातील अवघे तीन चार गटशिक्षण अधिकारी मिळाले. मात्र त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी एक तर बदली झाली, किंवा पदोन्नती मिळाली म्हणून त्यांना अल्पसा कार्यकाळ मिळाला. बारा वर्षात विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभार सोपविण्याची कार्यपद्धती येथे रूढ झाली आहे.
हेही वाचा – माटे हायस्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांना सकस पौष्टिक पोषण आहार देण्यासाठी कार्यरत असलेल्या शालेय पोषण आहार विभागाला तर प्रमुखपद चार वर्षांपासून रिक्त आहे. विकास बैसाणे यांचे ३० एप्रिल २०२१ला कोरोना काळात निधन झाल्यापासून पोषण आहार विभाग देखील पोरका बनला आहे. पोषण आहार शिष्यवृत्ती विविध विकासाभिमुख शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या या विभागाचा कारभार संगणक ऑपरेटरच्या भरवशावर सध्या सुरु आहे.
सहापैकी पाच पदे रिक्त
ज्यांच्याकडे तात्पुरती सूत्रे आहेत त्यांच्याकडे इगतपुरीला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असल्याने व्हाट्स मेसेज वर नांदगावचा पोषण आहाराचा विभाग सध्या कार्यान्वित आहे. तालुक्याला एकूण सहा विस्तार अधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना त्यातील पाच पदे रिक्त आहेत. केंद्रप्रमुखांची तेरा पदे मंजूर असून त्यातील सात पदे रिक्त आहेत मुख्याध्यापकांची बत्तीस पदे मंजूर असताना त्यातील दहा पदे रिक्त आहेत.
पदवीधर शिक्षकाची त्रेसष्ट पदे मंजूर असताना त्यातील छत्तीस पदे रिक्त आहेत. उपशिक्षकांची एकाहत्तर पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागाच्या आस्थापनेवर कार्यालयीन अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यकाचे एक पद अजूनही भरलेले नाही. त्यामुळे नांदगावच्या शिक्षण विभागाची अवस्था सहन होईना सांगता येईना अशी बनली आहे.
शिकविणाऱ्या गुरुजींचा बॅकलॉक कमी होण्याचे नाव घेत नाही. तालुक्यात गुरुजींची रोडवणारी संख्या लक्षणीय असून, ७० हून अधिक गुरुजींची वानवा भासत असते. याशिवाय गुरुजी मिळत नाही, मिळाले तर टिकत नाहीत. त्यामुळे कुणी तरी गुरुजी द्या हो गुरुजी, अशी मागणी प्रकर्षाने कायम पुढे येत असते. गुरुजी मिळावा म्हणून निघणारे सर्वाधिक मोर्चे नांदगाव तालुक्यातून निघत असतात, ते याच समस्येमुळे. अगोदर गुरुजी नाहीत. त्यात आहे त्या गुरुजींकडून कामे करून घेताना येणाऱ्या मर्यादा लक्षात घेतल्या जात नाहीत, अशी तालुक्यातील शिक्षकांची समस्या आहे.