“मराठी आई मेली तरी चालेल पण उत्तर भारतीय मावशी जगली पाहिजे”; आमदार प्रकाश सुर्वे यांचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) चे मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या एका वक्तव्याने राजकीय वाद निर्माण केला आहे. मराठी आई मेली तरी चालेल पण उत्तर भारतीय मावशी जगली पाहिजे. कारण ती जास्त प्रेम करते, असे संवेदनाहीन विधान प्रकाश सुर्वे यांनी केले आहे.
प्रकाश सुर्वे हे उत्तर भारतीय समाजाच्या कार्यक्रमात बोलत होते. महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय मतदार निर्णायक ठरू शकतात, या पार्श्वभूमीवर त्यांनी अमराठी समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना हे विधान केले. मात्र, मराठी आईचा अपमान करणारा आशय असल्याने हे वक्तव्य राजकीयदृष्ट्या उलटं पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : ‘सर्वाइकल कॅन्सर फ्री पुणे’ अभियानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ
प्रकाश सुर्वे नेमकं काय म्हणाले?
मराठी ही मातृभाषा आहे, माझी आई आहे. पण उत्तर भारत ही माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल परंतु मावशी मरता कामा नये. कारण मावशी जास्त प्रेम करते. खरे तर आईपेक्षाही मावशी जास्त लळा लावते. अमराठी, उत्तर भारतीय लोकांनी मला नेहमीच प्रेम दिले, आशीर्वाद दिले. तुमचे असेल प्रेम आणि आशीर्वाद माझ्या सहकाऱ्यांनाही द्या, असे आवाहन त्यांनी उपस्थित असलेल्या उत्तर भारतीय लोकांना केले.




