‘मुस्लिम समाजातून अधिक IAS-IPS अधिकारी झाले तर…’, नितीन गडकरींच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होती. आता गडकरी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ‘मुस्लिम समाजातून अधिक आयपीएस आणि आयएएस अधिकारी झाले तर सर्वांचा विकास होईल.’, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
एका संस्थेच्या दीक्षांत समारंभात बोलताना गडकरी यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. लाइव्ह हिंदुस्तानच्या रिपोर्टनुसार ते म्हणाले की, आम्ही कधीही या गोष्टींवर (जाती/धर्म) भेदभाव करत नाही. मी राजकारणात आहे आणि इथे बरेच काही सांगितले जाते. पण मी ठरवले की मी माझ्या पद्धतीने काम करेन आणि मला कोण मतदान करेल याचा विचार करणार नाही.
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार श्रीलंकेच्या दौऱ्यावर
ते पुढे म्हणाले, मी आयुष्यात हे तत्व अंगीकारण्याचा निर्णय घेतला. मी निवडणूक हरलो किंवा मंत्रीपद मिळाले नाही तरी मला काही फरक पडणार नाही. ‘जो करेगा जात की बात, उसको मारूंगा लात।’, या निवडणुकीतील घोषणेचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला.
गडकरी यांनी आमदार असताना अंजुमन-ए-इस्लाम संस्थान (नागपूर) अभियांत्रिकी महाविद्यालयाला परवानगी दिली होती. याबाबतचा देखील त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, जर मुस्लिम समाजातून अधिक इंजिनिअर्स, आयपीएस आणि आयएएस अधिकारी झाले तर सर्वांचा विकास होईल. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण आपल्याकडे आहे. शिक्षणामुळे समाजामध्ये बदल घडवण्याची ताकद असते, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.